Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भुजबळांना दणका, नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक
Nashik Chhagan Bhujbal : जिल्हा नियोजन समितीच्या 567 कोटींच्या कामांना ब्रेक देऊन इतक्या घाईत कामांना मंजुरी कशासाठी असा सवाल मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थित केला आहे.
Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ याना चागंलाच दणका दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या 567 कोटींच्या कामांना ब्रेक देऊन इतक्या घाईत कामांना मंजुरी कशासाठी असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. यानंतर एकनाथ शिंदे ऍक्टिव्ह झाले असून पहिलाच दणका त्यांनी भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ यांनी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कामांना मंजुरी दिली होती. मात्र या निधी वाटपावरून सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्षही पाहायला मिळाला होता. हा वाद थेट तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडेही गेला होता. त्यामुळे आता नवनियुक्त मुख्यमंत्र्यांनी सुहास कांदे यांच्या तक्रारीनंतर थेट या कामांनाच ब्रेक लावल्याने खळबळ उडाली आहे.
छगन भुजबळ पालकमंत्री असताना जिल्ह्यातील कामांकरिता निधी वाटप करण्यात आला. या जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भुजबळ आणि कांदे वाद चव्हाट्यावर आला होता. छगन भुजबळ हे ठेकेदारांना निधी विकत असल्याचा आरोप नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला होता. तसेच निधी वाटपावरून त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदर 567 कोटींच्या कामांना ब्रेक लावून घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी ? असा सवाल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे. दरम्यान नव्या सरकारमध्ये असणाऱ्या सुहास कांदे यांनी निधी वाटपाचा हा वाद तक्रारीद्वारे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट या कामांनाचं ब्रेक लावल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे.
नव्या सरकारचा दुसरा धक्का
राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपने मिळून नवीन सरकार स्थापन केलं आहे. यानंतर नव्या सरकारने सगळ्यात पहिला धक्का शिवसेनेला दिला होता. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचं जाहीर केलं होतं. अशात आता एकनाथ शिंदे यांनी हा दुसरा धक्का दिला आहे.
छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या हा वाद सुरु झाला होता. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी त्यावेळी केला होता. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळल होता. हा संघर्ष थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचला होता.