Nashik Crime : गाडी बदलली, नंबर प्लेट पण बदलली, डोळ्याला पट्टी बांधली, चिरागने सांगितला थरारक अनुभव
Nashik Crime : सायंकाळी घराजवळ खेळत होतो, अचानक काही लोक आली अन् मला उचलून नेलं.
Nashik Crime : सायंकाळी घराजवळ खेळत होतो, अचानक काही लोक आली अन् मला उचलून नेलं. माझं तोंड दाबलं असल्याने मला आवाज करता आला नाही. मला घेऊन गेले, त्यांनी गाडी बदलली, माझ्या डोळ्याला पट्टी बांधली. मात्र त्यानंतर रात्री टू व्हीलरवर घराजवळ सोडून दिले, असा ठराव प्रसंग सांगितला सिन्नर येथून अपहरण झालेल्या चिराग कलंत्री (Chirag kalantri) या दहा वर्षीय चिमुरड्याने.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (sinnar) शहरात घराजवळ खेळणाऱ्या चिराग कलंत्री या दहा वर्षीय मुलाचे काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पांढऱ्या ओमनी वाहनातून तोंडाला मास्क लावून आलेल्या काही इसमांनी अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियात वाऱ्यासारखी ही बातमी पसरल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता. रात्री सिन्नर वासीय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा सिन्नर मध्ये दाखल झाला. सिन्नरमधून जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर नाकाबंदी करण्यात येऊन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. मात्र रात्री जवळपास पाच तासानंतर चिराग स्वतः चालत चालत घरी सुखरुप परतला आणि त्याला बघताच कुटुंबाला आनंदाश्रू अनावर झाले तर सिन्नरवासीयांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान घरी परतल्यानंतर कलंत्री कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. आजोबांनी तर त्याला छातीशी कवटाळवून मनभरून प्रेम केले. यानंतर अपहरण झालेल्या चिराग याने अपहरणाची घटनेची आपबिती सांगितली. बसलेल्या सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. चिराग हा सायंकाळी घराजवळील गल्लीतील मित्राबरोबर खेळत होता. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक काही संशयितांनी येऊन मला उचलून नेले. तोंडावर फडके बांधल्याने बोलता येत नव्हते. एका गाडीत टाकण्यात आले. काही अंतरावर ही गाडी गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गाडीत बसवण्यात आले. यावेळी त्यांनी गाडीची नंबर प्लेटही बदलली.सगळं दिसत असल्याने त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. यानंतर कुठे होतो काही समजले नाही.
पहाटेला डोळ्यांवरील पट्टी काढली, गाडीवर बसून निघालो. आमच्या घराच्या दिशेने आलो, तेव्हा मला बरं वाटलं. एकाने दुचकीवरून खाली उतरून तिथून ते पळून गेले. त्यांनी कुठे नेलं होत माहित नाही, मारहाण वैगरे केली नाही. असा थरारक प्रसंग अफ्रान्झ आलेल्या चिराग याने कथन केला. यावेळी आजोबांना देखील बोलतांना अश्रू अनावर झाले. नातू सुखरूप आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार आजोबानी मानले. तर चिरागचे वडिल म्हणाले कि,आम्हाला कोणावर संशय नाही, पैसे वगैरे काहीच मागितले नव्हते, कोणाचा फोन पण नव्हता.. मात्र कोणावरच अशी वेळ येऊ नये.. पोलीस, समाज बांधव, मित्र मंडळी सगळ्यांनी खूप सहकार्य केले, त्यामुळे आमचा चिराग परत मिळाला असल्याचे ते म्हणाले. दरम्यान संशयितांनी जिथून चिरागचे अपहरण केले होते, तिथेच दुचाकीवर त्याला सोडून इथून पळ काढला होता. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीसांकडून काही सांशयितांना ताब्यात घेण्यात येऊन सध्या चौकशी केली जात आहे.