Nashik Chhagan Bhujbal : भाजप शिवसेना संपवायला निघालीय, सगळं कसं स्क्रिप्टनुसार, छगन भुजबळ स्पष्टच बोलले...
Nashik Chhagan Bhujbal : भाजप शिवसेना संपवायला निघालीय, सगळं कसं स्क्रिप्टनुसार, छगन भुजबळ स्पष्टच बोलले...
Nashik Chhagan Bhujbal : सामान्य माणूसही सांगतोय, शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच (Udhhav Thackrey) आहे, शिंदे गटाने थांबले पाहिजे. शाखा, कार्यालयं संदर्भात आमचे हेच सुरू आहे, बांधाला बांध असताना जशी मारामारी चालते, तसेच राजकारणातही सुरू आहे. आता लोकांनी हेच बघायचं का? दुसरीकडे भाजप (BJP) शिवसेना संपवायला निघाली आहे, अशा स्पष्ट शब्दात छगन भुजबळ बोलले आहेत.
शिंदे गटाला शिवसेना (Shivsena) नाव आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरेंच्या कार्यालयावर ताबा घेण्याचे काम सुरु आहे. शिवाय शाखा, कार्यालय ताब्यात घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गट- ठाकरे वादावर शिंदे गटाला धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, काही दिवसांतील राजकारण बघता अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे, हे या लोकांच्या का लक्षात येत नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला. शिवाय सामान्य मनुष्य सांगतो की शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आहे. मग हे शिंदे गटाच्या लक्षात येत नाही का? शिंदे गटाने थांबले पाहिजे, शाखा, कार्यालय ताब्यात घेण्याचं सुरु आहे, शेतकऱ्याच्या बांधाला बांध असताना जशी मारामारी चालते, तसे इथे सुरू आहे? लोकांनी हेच बघायचं का? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.
छगन भुजबळ यावेळी कोर्टातील सुनावणीवर म्हणाले की, थोडाफार विश्वास न्यायालयावर आणि चंद्रचूड यांच्यावर असून त्यांनी लवकरात लवकर सुनावणी संपवायला पाहिजे. रोज सुनावणी होतेय, दोन पक्ष झाले. पण आता सर्वच ते घेऊन जात आहेत. उद्या मातोश्री ही बाळासाहेब ठाकरे यांची बसण्याची जागाही घेऊन जातील, हे आता थांबायला पाहीजे, इथं पर्यंत जाण्याची गरज नाही. आम्ही बाहेर पडलो, काहींनी नवीन पक्ष काढले, पण असे कधी झाले नाही. अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरेंना आहे हे या लोकांच्या का लक्षात का येत नाही हेच समजत नाही. उद्धव ठाकरे यांचे म्हणणं वेगळे असून भाजपचे म्हणणं वेगळे आहे. म्हणून भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. काहींना ईडीची नोटीस होती. काही लोकं तिकडे गेल्यानंतर ईडी कारवाई बंद झाली. हे सगळं एका स्क्रिप्टनुसार झाल्याचे भुजबळ म्हणाले. शिवाय याची कल्पना उद्धव ठाकरे यांना नव्हती असे काही नाही, त्यांना कल्पना होती, असेही ते म्हणाले.
भाजपचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट केले आहे, यावर ते म्हणाले की, हे गृहस्थ त्यांचे काम संशयास्पद होते, त्यांना हटवण्यात यावे लोकशाही टिकवण्यासाठी असे लोक हटविले पाहिजे. आता काही गोष्टी बाहेर येताय, आणखी काही बाहेर येतील. तर राज्यपालांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये अडकतील एवढे नवीन आणि लहान नाही, राजकारणाचे बाळकडू त्याना मिळाले आहे. सर्व राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे. ट्रॅपमध्ये अडकतील असे वाटत नाही, त्यांना वाटले भाजपसोबत राहायचे नाही, शिवसेनेला इतर पक्षाच्या तुलनेत कमी मंत्रिपद भाजपने दिले, त्याचा परिणाम आहे. एका दिवसात भाजप सोडली नाही. 12 आमदार नियुक्ती पत्राबाबत भुजबळ म्हणाले कि, 15 दिवसात आमदार नियुक्त बाबत आम्हाला कळवा, असे पत्र दिले, धमकी नाही. जरी तसे असले तरी राग किती दिवस डोक्यात ठेवायचा, दोन महिने तीन महिने सरकार पडेपर्यंत राग डोक्यात ठेवायचा का? नाव आणि निशाणी दिली आहे. त्यानुसार नियुक्ती करतील, जनतेच्या कोर्टात फैसला होईल. एक पुढे जाईल एक मागे थांबेल
भाजपला पराभव दिसतोय...
कसबामध्ये बापट साहेबांना आणले, त्यांचा फोटो बघून मला गलबलून आले. मी अनेक वर्षे त्यांच्याबरोबर सभागृहात काम केले. आज ते ज्या परिस्थितीत आहेत त्यांना इन्फेक्शन झाले तर काय, त्यांची काळजी घय्याला पाहिजे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे लोक निवडून आलेत. आता पुन्हा या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे लोक निवडून आलेत. तर त्याचा परिणाम आगामी सर्व निवडणुकीवर होईल, असे भाजपला वाटते. म्हणून ते प्रयत्न करतात, त्यात गैर काही नाही.