(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik APMC Election : छगन भुजबळांचा मास्टरस्ट्रोक; लासलगावात दोन्ही गट एकत्र, सभापतीपदी बाळासाहेब क्षीरसागर
Nashik APMC Election : लासलगाव बाजार समितीत दोन्ही गट एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Nashik APMC Election : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Bajar samiti) निवडून आलेल्या दोन्ही गटांना एकत्र करत भुजबळ समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापती पदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी दिली. यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ (Onion Market) असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही गटांना समसमान 9 जागा मिळाल्या. त्यामुळे या बाजार समितीत (Bajar Samiti) सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. छगन भुजबळ यांनी शिष्टाई करत दोन्ही गटातील उमेदवारांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही गट एकत्र करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये माजी आमदार वसंत गीते, हेमंत धात्रक आणि प्रकाश दायमा यांनी महत्वाची भूमिका बजावली.
छगन भुजबळ यांनी यंदा बाजार समितीच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातले. येवला असो की, लासलगाव बाजार निवडणुकीत भुजबळ थेट रिंगणात उतरले होते. मात्र येवल्यात महाविकास आघाडीला छेद देत उद्धव ठाकरे शिवसेना (Shivsena) गटाचे आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे यांनी थेट भुजबळांना खुले आव्हान दिल्यामुळे येथील रंगत वाढली आहे. तर लासलगाव बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचेच पंढरीनाथ थोरे यांनी भाजपचे ज्ञानेश्वर जगताप यांच्या साथीने भुजबळांची कोंडी केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र पंढरीनाथ थोरे गटाने 9 जागा, तर छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली जयदत्त होळकर गटाला 8 जागा मिळाल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत छगन भुजबळ यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर (Balasaheb Shirsagar) यांना सभापतीपदी संधी देण्यात आली. तर समोरच्या गटातील तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारभार होण्यासाठी छगन भुजबळ यांनी दोनही गटांना एकत्र करत विकासाच्या मुद्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. लासलगाव आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची जबाबदारी छगन भुजबळ यांनी दिलीप खैरे यांना दिली होती. त्यांनी या दोन्ही बाजार समितीच्या निवडणुकीत चोख नियोजन करून राष्ट्रवादीला विजयापर्यंत नेले.