(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari : आज नाथांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण, करकंबला मुक्काम, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 428 किमीचा पायी प्रवास
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा चोवीसावा दिवस आहे.
Sant Nivruttinath Palkhi : 'अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥..., ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम..' असा हरिनामाचा गजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदूंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Palkhi) ने सोलापूर जिल्ह्यात असून कालच्या दगडी अकोले येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी माढा येथील मुक्कामानंतर पालखीने पुढील मुक्कामासाठी आष्टीकडे मार्गक्रमण केले आहे.
गेल्या तेवीस दिवसांपासून पंढरपुरला (Pandharpur) विठुरायाच्या दर्शनासाठी दिंड्याचे प्रस्थान झाले असून लाखो भाविक पायी वारी करीत आहेत. आतापर्यंत अनेक दिंड्यानी तेवीस दिवसांहुन अधिक दिवसांचा प्रवास करत मजल दर मजल करत पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू आहे. भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, अभंगांच्या गोडीने अन् विठ्ठलाच्या ओढीने एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहेत. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा चोविसावा दिवस आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात असून काल दगडी अकोले येथे मुक्कामी होती. या मुक्कामानंतर नाथांची पालखी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. आता काही अंतरावर पंढरपूर असून एक दिवसाच्या मुक्कामानंतर दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहचणार आहेत. त्यामुळे दिंडीतला वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेला असून कधी एकदाची भेट होतेय, अशी अवस्था वारकऱ्यांची झाली आहे. संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी सोलापूर जिल्ह्यात असून कालच्या माढा येथील मुक्कामानंतर आज पालखीने माढा येथून गावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण केले आहे. आज वडाची वाडी येथील तुकाराम नारायणराव काळे यांच्याकडून दुपारचे जेवण दिले जाणार असून त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आष्टी शहरात मुक्काम करणार आहे.
आज पालख्यांचा मुक्काम कुठे?
संत निवृत्तीनाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात असून अवघ्या काही अंतरावर पंढरपूर आहे. अजून दोन दिवसांचा मुक्कामनाथांच्या पालखीचा होणार असून त्यानंतर पंढरपूर शहरात दाखल होणार आहे. काल दगडी अकोले येथील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पायी मार्गाने परीते, चांभारविहीरमार्गे करकंब या गावी मुक्कामाला पोहचणार आहे. आज नाथांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण चांभारविहीरला पार पडणार आहे. संत निवृत्तीनाथांच्या पायी दिंडी पालखीने आतापर्यंत 379 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. तर माढा गावात मुक्कामी असलेली संत मुक्ताबाईंची दिंडी पायी मार्गाने आष्टी गावात मुक्कामाला जाणार आहे. आतापर्यत मुक्ताईनगर पासून पालखीने तब्बल 428 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.