(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Trimbakeshwer News : त्र्यंबकेश्वर मंदिर पिडींवरील बर्फाची प्रशासनाकडून दखल, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
Nashik Trimbakeshwer News : त्र्यंबकेश्वराच्या (Trimbakeshwer) पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Nashik Trimbakeshwer News : त्र्यंबकेश्वराच्या (Trimbakeshwer) पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियातून (Social Media) झळकल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पिंडीवर बर्फ कस जमा झाला याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील जोतिर्लिंगाची (Trimbakeshwer Jotirlinga) बारा जोतिर्लिंगांपैकी आद्य जोतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर ला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे प्रचलित असल्याने देशभरातून भाविकांची रेलचेल असते. दरम्यान मंदिर गाभाऱ्यातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याच्या घटनेने सोशल मीडियात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र ही नैसर्गिक घटना असून हा काही चमत्कार नाही, असे स्पष्टीकरण नाशिक अंनिसने दिले होते.
दरम्यान या घटनेननंतर आता स्थानिक मंदिर प्रशासन या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार असल्याचेच समजते. सदर प्रकरणाची मंदिर प्रशासनाने दखल घेतली असून यासाठी तीन विश्वस्तांची चौकशी समिती नेमली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करून सोमवारी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे अहवालात नेमक काय समोर येणार? याची उत्सुकता सर्वच नागरिकांना लागली आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच शेकडो नागरिक आश्चर्यचकित झाले होते. मात्र हे प्रकरण संशयास्पद असल्याचा अनेकांनी दावा केला होता.
स्थानिक काय सांगतात...!
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात नेहमी जाणाऱ्या एका स्थानिक नागरिकाने सांगितले कि, इतर ठिकाणच्या मंदिरात आढळून येणाऱ्या पिंड हि वरच्या बाजूला असते. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंड हि आतमध्ये असून एक फूट खड्डा आहे. या यात ब्रह्म विष्णू महेश यांच्या पिंडी आहेत. या पिंडीवर सातत्याने गोदावरी नदीचे उगमाचे पाणी पडत असते.मी त्याचबरॊबर भाविकांनी वाहिलेले दूध, किंवा इतर दिवशी केलेला अभिषेक यामुळे सातत्याने पडणाऱ्या पाण्यामुळे ते भरलेले असते. आणि याचमुळे गारवा निर्माण होऊन बर्फाचे गोळे तयार झाले असावेत, असे या नागरिकांनी सांगितले.
अंनिसच्या वतीने आवाहन
कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाहीत. भाविकांनी आणि सामान्य नागरिकांनी अशा नैसर्गिक घटनांना चमत्कार समजू नये. मुळात चमत्कार कधीच घडत नसतात. एक तर अशा नैसर्गिक घटनांमागील कार्यकारणभाव समजून घेण्याची तसदी आपण घेत नाहीत आणि काही नागरिक चमत्काराच्या माध्यमातून समाजात अफवा पसरवण्याचे काम करत असतात. म्हणून लोकांनी अशा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये. तसेच संबंधित पोलीस प्रशासनानेही याची तातडीने दखल घेऊन, अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे अंनिसच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.