Nashik Crime : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर आली असून विवाहित महिलेला वडापावच्या माध्यमातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पाणी विकणाऱ्या कुणाल पवारने आपल्या रिक्षाचालक मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचं समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिक शहरातही गुन्हेगारी (Crime) नित्याची झाली आहे. सराईत गुन्हेगारांसोबतच आता सामान्य गुन्हेगार उदयास येऊ लागले आहेत. पोलिसांचा (Nashik Police) वचकच कमी झाल्यामुळे कोणीही पोलिसांना धजावत नसल्याचे चित्र आहे. अशातच नाशिकरोड रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकावर झोपलेल्या एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन रिक्षात बसवून अज्ञातस्थळी घेऊन जात दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार (Molestation) केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड भागात घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह नाशिकरोड रेल्वेस्थानकावर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


दरम्यान नाशिकरोड (Nashikroad Railway) रेल्वेस्थानकावर आश्रयास असलेल्या एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पाणी विकणाऱ्या कुणाल पवारने आपल्या रिक्षाचालक मित्राच्या मदतीने हे कृत्य केल्याचं समोर आहे आहे. या घटनेनंतर रेल्वेस्थानकावरील अनाधिकृत विक्रेत्यांवर नियंत्रण कोणाचे? असा प्रश्न आता उपस्थित होत असून रिक्षाचालकांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग हा देखील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 


रेल्वेस्थानकावर नेमकं काय घडलं?


पिडीत महिलेची घरची परिस्थिती गरिबीची असून गुजरातहून मुंबई आणि मुंबईहुन पंजाब मेलने बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली होती. दरम्यान तिच्याकडे मोबाईल नसल्याने सहप्रवाशाच्या मोबाईलवरून तिने नाशिकला राहणाऱ्या आपल्या बहिणीला कॉल केला असता रात्रीची वेळ असल्याने 'मी आता येऊ शकणार नाही तू स्थानकावरच थांब' असे बहिणीने सांगताच प्लॅटफॉर्म दोनवरील एका बाकड्यावर पिडीत महिला बसली होती. दरम्यान रात्री दोन वाजेच्या सुमारास पाणी विक्रेता कुणाल तिच्याजवळ आला आणि मदतीच्या बहाण्याने गप्पा करत तिला वडापाव खाण्यासाठी दिला. मात्र वडापाव खाताच तिला हळू हळू चक्कर येऊ लागली. त्यानंतर कुणालने तिला प्लॅटफॉर्मबाहेर बळजबरी नेत प्रकाश मुंढे या आपल्या रिक्षाचालक मित्राच्या रिक्षेत तिला बसवत गुंगीचे औषधही पाजले आणि जवळपास 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेहडी परिसरात मळे भागात नेत शेतात तिच्यावर त्यांनी आळीपाळीने अत्याचार केला. 


सीसीटीव्हीच्या आधारे तपास 


विशेष म्हणजे हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिला मारहाण करत या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केल्यास परिणाम वाईट होतील, अशी धमकीही देत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान काही वेळातच मुलीने आरडाओरड करताच परिसरातील एका इमारतीचा वॉचमन तिच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने नाशिकरोड पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी महिलेला तात्काळ रुग्णालयात हलवले आणि गुरुवारी गुन्हा दाखल करत रेल्वेस्थानकावरील सिसीटिव्ही कॅमेरा फुटेजच्या आधारे आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जात असून एकंदरीतच या संपूर्ण प्रकारामुळे रेल्वेस्थानकावरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत असून हे संवेदनशील प्रकरण असल्याने पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. 


हे ही वाचा :


Nashik Crime : इगतपुरी हादरलं! कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर अत्याचार, नंतर संपवलं