Marine Drive Hostel Crime News : मरीन ड्राईव्ह हत्या (Marine Drive Hostel Murder) प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे. तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. पण आता फॉरेन्सिक अहवालात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड
मुंबईतील शासकीय वसतिगृहामध्ये मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला होता. मुंबईतील शासकीय वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत 6 जून रोजी तरुणीचा मृतदेह आढळला होता. अकोल्यातील 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी राज्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या फॉरेन्सिक अहवालाचा हवाला देत ही माहिती दिली आहे.
फॉरेन्सिक अहवालातून महत्त्वाची अपडेट समोर
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम प्रकाश कनोजियाच्या हाडाचे डीएनए नमुने पीडितेच्या नखांवरून मिळालेल्या डीएनए नमुन्याशी जुळले आहेत. पोलिसांनी पुढे सांगितलं की, "घटनास्थळी ठिकाणी सापडलेल्या सीमेन सँपलचे डीएनए मुलीच्या नेल क्लिपिंगमधून मिळालेल्या डीएनए प्रोफाइलशी जुळले आहेत." असे अधिकारी पुढे म्हणाले. तसेच व्हजाइनल स्वॅब तपासणीतही लैंगिक अत्याचार झाल्याची पुष्टी झाली आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर लगेचच कनोजिया यांनी आत्महत्या केली होती. आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने प्रतिकार केला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनीवर वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने बलात्कार करुन तिची हत्या केली. त्यानंतर वॉचमनने स्वत:देखील रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली. पोलिसांना वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावर या तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. सुरक्षारक्षकाने या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यास निदर्शनास आलं होतं त्यानंतर पोलिसांनी त्या सुरक्षा रक्षकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण त्यानंतर काहीच वेळात आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या सुरक्षा रक्षकाने जवळील चर्नी रोड स्थानकावर जाऊन ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला.
या प्रकरणामुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत मुली सुरक्षित नाहीत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.