Nashik BJP Adhiveshan : नाशिक (Nashik) आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून रणशिंग फुंकण्यासाठी येत्या 10 आणि 11 फेब्रुवारीला भाजपचे राज्य अधिवेशन नाशिकला होणार आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीची चर्चा होती. मात्र, अधिवेशन चार दिवसांवर आलेले असूनही त्यांच्या दौऱ्याचे नियोजन आलेले नाही. त्यामुळे शाह यांच्याविनाच अधिवेशनाची शक्यता असून पर्यायी नेतृत्वाचे नाव अद्याप निश्चित झाले नसल्याचेही समजते.
लोकसभा व विधानसभा निवडणुका तसेच महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता असल्याने या निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी भाजप अधिवेशन आयोजित केले आहे. दोन दिवशीय अधिवेशनाचा कार्यक्रम सातपूरच्या डेमोक्रसी हॉटेलमध्ये आठशे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढील वर्षाच्या निवडणुकांसाठी सज्ज होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्व अमित शाह हे राज्यस्तरीय अधिवेशनाला स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अधिवेशन आणि सभेच्या दृष्टीने जय्यत तयारीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही अमित शहा यांच्या दौऱ्याच्या कालावधीचे निश्चित स्वरूप स्थानिक नेतृत्वापर्यंत पोहोचले नसल्याने त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता झाली आहे.
राजस्तरीय अधिवेशना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन जलदगतीने घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे या राज्य अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर भाजपाचे केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री, राज्यातील सर्व 23 खासदार, 104 आमदार उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपाचे राज्यभरातील 800 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा अधिवेशनात अंतर्भाव असणार आहे. मात्र मोदींच्या दौऱ्यामुळे अमित शहा नाशिकमध्ये येण्याची चिन्हे कमी आहेत. त्यामुळे नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर संमेलनाची विशेष जबाबदारी असली तरी शहा यांच्या अनुपस्थितीच्या चर्चेने पदाधिकारी देखील संभ्रमात आहेत.
गृहमंत्री अमित शाह नाशिकला येणार का?
दरम्यान नाशिकचे राज्य अधिवेशन प्रारंभी येत्या शुक्रवारी शनिवारी दोन दिवस भरण्याची शक्यता होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी शासकीय दौऱ्यानिमित्त 10 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यानंतर अर्थात दुपारनंतरच राज्यातील प्रमुख पदाधिकारी नाशिकला येऊ शकणार असल्याने अधिवेशनाचा प्रारंभ नेमका कधी होणार हे दोन एक दोन दिवसांनी निश्चित होणार असल्याचे नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचा दौरा आटोपून राज्यातील चारही केंद्रीयमंत्री अर्थातच नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, डॉ. भारती पवार हे विमानाने नाशिकला येतील. त्यामुळे कमी पदाधिकाऱ्यांचा उपस्थित फास्ट फॉरवर्ड पद्धतीने अधिवेशन आटोपण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा नाशिकला येणार का? भाजपचे दोन दिवशीय अधिवेशन एक दिवसाचे होईल का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.