Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि गौतम अदानीसोबतचा फोटो दाखवून राहुल गांधींचे घणाघाती आरोप..
भारत जोडो यात्रेचा समारोप झाला तरी राहुल गांधी आपला लूक बदललेला नाही. वाढलेली दाढी घेऊनच राहुल गांधी यांनी संसदेत प्रवेश केला. सीपीएमचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी राहुल गांधी याचं स्वागत केलं. (PTI Photo/Kamal Singh)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी संसदेत दाखल होत असताना टिपलेला त्यांचा फोटो. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या दररोज उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत चिरंजीव आणि केरळमधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सहमती झाली. यामुळे अदानी प्रकरणावरुन सुरु असलेला तिढा काही प्रमाणात का होईना सुटायला मदत झाली. (PTI Photo)
संसदेच्या आवारातही राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांची भेट आणि हस्तांदोलन हा दोन पिढ्यांमधील संवाद होता. संसदेच्या आवारातही आज हे दोन नेते भेटतानाची देहबोली हा चर्चेचा विषय होता. (PTI Photo/Kamal Singh)
लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला. ही चर्चा सुरु असताना टिपलेली त्यांची भावमुद्रा (PTI Photo).
राहुल गांधी यांनी संसदेच्या सभागृहात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांच्या मैत्रीवर घणाघात केला. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच अदानी समुहाच्या उत्कर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचा आरोप त्यांनी केला. (PTI Photo)
पंतप्रधान मोदी यांनी ज्या ज्या देशांचे दौरे केले, तिथल्या प्रकल्पांमध्येही अदानी समुहाला फायदा मिळाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. 2014 ते 2022 या फक्त आठ वर्षांमध्येच गौतम अदानी यांच्या संपत्तीत 8 अब्ज डॉलर्सवरून थेट 140 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ कशी झाली, असा सवाल भारत जोडो यात्रेत भेटलेले लोक विचारत असल्याचं त्यांनी सांगितलं. (PTI Photo)
कन्याकुमारी ते काश्मीर अशी तब्बल 3500 किलोमीटरच्या आसेतुहिमाचल भारत जोडो यात्रेतील अनुभवाचा उल्लेख करुन त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांना जागोजागी भेटलेल्या लोकांनी फक्त अदानी समुहाची चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. अदानी वावर जवळपास सर्वच उद्योग-व्यवसायामध्ये आहे. देशभर त्यांच्या उद्योगाचं जाळं पसरलेलं आहे. ते ज्या उद्योगात जातात त्या सर्व उद्योगांची भरभराट होते असं लोक म्हणत असल्याचं ते म्हणाले. हे करत असताना त्यांनी अदानी समुहाची ब्रोशरही सभागृहात दाखवलं. हे दाखवून त्यांनी अदानीची भरभराट फक्त पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा परिणाम असल्याचा आरोप केला. (PTI Photo)
यानंतर राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी विमानातून एकत्र प्रवास करत असल्याचा फोटो सभागृहात झळकवला. राहुल गांधी यांनी सभागृहात दाखवलेला फोटो बहुदा निवडणूक प्रचाराच्या वेळी अदानी समुहाच्या विमानांचा वापर केला त्याचा असावा. मात्र या विमानात गौतम अदानींची उपस्थिती सर्वांनाच अचंबित करणारी होती. हा फोटो म्हणजे अदानी समुहाच्या यशाचं रहस्य असल्याचा आरोप त्यांनी केला. (PTI Photo)
भाजपची सत्ता आल्यावर गौतम अदानी यांनी श्रीमंताच्या यादीत 600 व्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर मजल मारल्याचं त्यांनी सांगितलं. अदानी समुहाला विमानतळ आधुनिकीकरणाचं कंत्राट मिळावं यासाठी नियमातही बदल करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यावेळी केंद्रीय कायदे मंत्री किरण रिजीजू यांनी त्यांना सभागृहात बिनबुडाचे आरोप करु नये असं म्हणत थांबवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हे एक ज्येष्ठ आणि सन्माननीय खासदार आहेत, त्यांनी सभागृहात असे पुरावे नसलेले आरोप करणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं. (PTI Photo))
त्यावेळी सत्ताधारी बाकांवरुन भाजप खासदारांनी गौतम अदानी आणि काँग्रेस नेते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या संबंधांवरही प्रकाश टाकावा अशी मागणी केली.