Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील तरुण-तरुणी आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये ई सिगारेट (E Cigarette) ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तरुणाईभोवती व्यसनाधीनतेचा वाढता विळखा लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी कॉलेजरोड परिसरात मोठी कारवाई केली आहे. जवळपास 88 हजारांचे ई सिगारेट हस्तगत करण्यात नाशिक पोलिसांना (Nashik Police) यश आले आहे. 


नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांची (Drugs) विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणताही अमली पदार्थ हे शरीरासाठी धोकादायक असताना देखील विक्रेत्यांकडून सर्रास विक्री होत आहे. त्यामुळेच ई सिगारेट ओढण्याकडे तरुणाईचा कल अधिक आहे. नाशिक शहरात शाळा आणि कॉलेजमधील तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्याने नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. शहरात बेकायदेशीररित्या प्रतिबंधित नशेच्या वस्तू आणि साहित्य साधने विक्री करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना पोलीस आयुक्तांकडून देण्यात आलेल्या होत्या. 


दरम्यान, या पार्श्वभूमीवर गुन्हेशाखेच्या पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर कॉलेजरोड परिसरात सापळा रचला. यावेळी प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्रीकरता आलेल्या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. सर्वेश रामधनी पाल, फैसल अब्दुल बारे शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींच्याकडून काळ्या रंगाच्या बॅगमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या 9 निकोटिन युक्त ई सिगारेटच्या बॉक्स आढळून आले. यात वेगवेगळया फ्लेवरचे प्रतिबंधित असलेले 80 नग निकोटिनयुक्त ई सिगारेट किंमत रुपये 87 हजार 900 रुपये किंमतीचे बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. 


ई सिगारेट म्हणजे काय? 


नाशिक शहरात वाढत असलेल्या ई सिगारेटची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही त्याला ई सिगारेट म्हणतात. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरिरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट ही साध्या सिगारेटसारखी दिसते. मात्र ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन वापरले जाते. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते, तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते.