Dhule Crime : धुळे स्थानिक गुन्हे  (Dhule Crime) अन्वेषण विभागाने मोटार सायकल चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे, त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या एकूण 5 मोटारसायकली धुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


धुळे शहरात (Dhule) दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश राज्य असल्याने संशयित चोरटे मध्यप्रदेशात (Madhyapradesh) पलायन करत आहेत. तर मध्यप्रदेशात चोरी केलेले संशयित धुळ्याकडे पोबारा करत आहेत. अशातच चोरी झालेल्या मोटारसायकल प्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील जुलवानिया (ता.बडवाणी) येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मध्यप्रदेश मधून धुळ्याकडे येणाऱ्या दोन संशयास्पद व्यक्तींना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अडवत त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या ताब्यातील मोटारसायकली संदर्भात कुठलीही कागदपत्रे त्यांच्याकडे आढळली नाही. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना धुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.


संशयितांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व मोटारसायकलींची किंमत 2 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. जिब्राईल हुसैन अहीर अशी संशयितांची नावे आहेत. मोटर सायकल जुलवानिया येथून चोरी करून धुळे येथे त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या संशयितांनी धुळे पोलिसांना दिली. यापूर्वी संशयित आरोपी मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. परंतु त्या दुचाकी नादुरुस्त असून, धुळे येथील संशयितांच्या नातेवाईकांकडे ठेवल्या असल्याचे सांगितले. या तीनही मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून अजून किती मोटारसायकल त्यांनी लांबविल्या आहेत. त्याचा तपास धुळे पोलिस करत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.


पिकअप वाहनातून गुरांची वाहतूक रोखली


मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नरडाणा नजीक दभाषी फाट्यावर नरडाणा पोलिसांनी पिकअप व्हॅन पकडली. वाहनाची तपासणी केली असता त्यात गुरे आढळून आली. गुरांना गोशाळेत पाठविण्यात आले असून फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. महामार्गावरून गुरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील दभाषी फाट्यावर पोलिसांनी सापळा लावला. पहाटे 5 वाजेच्या सुमारास पिकअप व्हॅन येताच तिला थांबवण्याचा इशारा पोलिसांनी दिला. चालकाने थोड्या अंतरावरच वाहन थांबवून पळ काढला, पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात गुरे आढळून आली. पोलिसांनी पिकअप वाहनासह गुरे असा एकूण 1 लाख 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला