Nashik Farmers : 'तुमच्या साथीला आम्ही आहोत ना बाबा', नाशिक विभागात वर्षभरात 362 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
Nashik Farmers : फक्त मराठवाडा किंवा विदर्भचं नाहीतर नाशिक जिल्ह्यासह विभागातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
Nashik Farmers : फक्त मराठवाडा किंवा विदर्भाचं नाहीतर नाशिक जिल्ह्यासह विभागातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. याच उदाहरण गेल्या मागील वर्षभरात नाशिक विभागात जवळपास 362 शेतकऱ्यांची मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आजही शेतकऱ्यांची अवस्था जैसे थे असून शेतकऱ्याला कुणी वाली आहे की नाही असा सवाल नेहमीप्रमाणे उपस्थित झाला आहे.
नुकतंच 2022 हे वर्ष सरल अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या. राज्यात सत्तांतर झालं, नवीन राज्य सरकार महाराष्ट्रात आले. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे. नाशिक विभागातील 362 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला जवळ केले. विशेष म्हणजे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असली, तरी सरकारी पातळीवरून देण्यात येणाऱ्या मदतीसाठी मात्र 157 शेतकऱ्यांचेच कुटुंबीय पात्र ठरले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे कुटुंबीय मात्र मदतीपासून वंचित राहिले आहेत.
दरम्यान जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या अकरा महिन्यांत नाशिकसह धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांमधून एकूण 362 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यांपैकी 157 शतेकऱ्यांचेच कुटुंबीय सरकारी पातळीवरून देण्यात येणाऱ्या एक लाख रुपये मदतीसाठी पात्र ठरले. कारण पंचनामा, तसेच अन्य कागदपत्रांच्या आधारे एवढ्या शतेकऱ्यांनी खरोखरच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष सरकारी यंत्रणांनी काढला. उर्वरित 112 शतेकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे खरे असले, तरी त्यांचे आत्महत्या करण्यामागचे कारण कर्ज नव्हे, तर वेगळेच असल्याने त्यांचे कुटुंबीय सरकारी मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. आत्महत्या केलेल्या 93 शतेकऱ्यांच्या बाबतीत मात्र अजून निर्णय व्हायचा आहे. या शतेकऱ्यांनी आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली, त्याचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरच मदतीसाठी किती शतेकरी कुटुंबीय पात्र हेही समजणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील 181 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नंदुरबार जिल्ह्यात सर्वांत कमी आत्महत्या झाल्या आहेत. आठ शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. राज्यात ज्या ज्यावेळी कोणतेही सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी हे करणार ते करणार अशी आवई उठवली जाते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी भरीव असे काहीच पडत नाही. राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र थांबायला तयार नाहीत, हेच अधोरेखित झाले आहे.
आत्महत्या आहे पर्याय नाही...
शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असून यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडून ज्या काही उपपयोजना करण्यात येतात त्या फोल ठरत असल्याचे यावरून दिसून येते. शेतकऱ्यांना मालाला भाव, वीज वेळेवर मिळाले कि शेतकरी समाधान व्यक्त करतात. त्यांना राज्यात कुठले सरकार आहे, याचे सोयरसुतक नसते. मात्र प्रत्येकवेळी निराशा पदरी पडली कि शेतकरी हवालदिल होऊन असा टोकाचा निर्णय घेतात, मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही, शेतकरी म्हणजे परिस्थितीला तोंड देण्यासाठीचे दुसरे नाव असते. त्यामुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी ठेवली पाहिजे.