Nashik News : विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शिक्षकांवर '302' अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत विद्यार्थ्याचा मृतदेह नांदगाव-संभाजी नगर महामार्गावर ठेवत संतप्त नातेवाईकांनी तब्बल दोन तास रास्ता-रोको आंदोलन केले. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या आवारातील शेततळ्यात बुडून सोमवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर महाविद्यलयातील शिक्षकास जबाबदार धरत आंदोलन करण्यात आले. 


नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील सी.के.पाटील कृषी विद्यालयात डिप्लोमाचे दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय सागर म्हसू कांदे याचा विद्यालयाच्या आवारातील शेततळ्यात बुडून सोमवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सागरच्या नातेवाईकांना घटनेबाबत अवगत करणे महत्वाचे होते. मात्र विद्यालय प्रशासनाकडून माहिती न मिळाल्याने नातेवाईकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांकडे धाव घेत सागरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शिक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. मात्र मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर त्यात जे काही निष्पन्न होईल त्यानंतर खुनाचा किंवा अन्य जे काही असेल तो गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलिसांनी नातेवाईकांना बराच वेळ तिष्ठत ठेवून गुन्हा दाखल केला नाही. 


तसेच पोलीसही गुन्हेगारांना पाठिशी घालत असून गुन्हा दाखल करण्यास विलंब करत असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात असलेला सागरचा मृतदेह उचलून थेट नांदगाव-संभाजी नगर महामार्गावरील गंगाधरी बायपास येथे रस्त्यावर ठेवला. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह इथून हलवणार नाही, असा ठाम पवित्रा घेत रास्ता - रोको आंदोलन सुरु केले. तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी नातेवाईकांची समजूत काढत पोलीस स्थानकात चला, गुन्हा दाखल करु असे सांगितले. मात्र घटना घडून पाच तास होत आले. तरीदेखील तुम्ही गुन्हा दाखल करुन घेतला नाही, असा पोलिसांच्या भूमिकेवरच आक्षेप घेत आता इथेच गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेत पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला. 


जवळपास दोन तास गोंधळ सुरुच होता. या दोन तासांच्या काळात रस्त्यांच्या दुतर्फा दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. नातेवाईकांचा उद्रेक वाढू नये म्हणून खुनाचा गुन्हा दाखल करणार असल्याची लिखित प्रत स्वाक्षरीसाठी आणली. मात्र आंदोलक नातेवाईकांनी ऑनलाईन दाखल झालेली फिर्याद दाखवा, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर सी.के.पाटील कृषी विद्यालयाच्या स्टाफवर गुन्हा दाखल झाल्याची प्रत आंदोलकांना दाखवल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मृतदेह रुग्णवाहिकेत नेण्यास नकार देत आंदोलन स्थळापासून ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत खांद्यावर वाहून नेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.ख्याती तुसे आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत संपूर्ण शवविच्छेदनाचे चित्रीकरण यावेळी करण्यात आले.


नातेवाईकांना घातपाताचा संशय 


सागर म्हसु कांदे हा विद्यार्थी जातेगाव येथील सी.के.पाटील विद्यालयात कृषी विषयक पदवीचे शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी तो आपल्या दुचाकीवरुन विद्यालयात गेला असता येथील शिक्षकांनी सागरला शाळेच्या आवारात असलेल्या शेततळ्यातून मासे पकडण्यासाठी पाठवले मासे पकडत असताना सागरचा बुडून मृत्यू झाला. सागर हा पट्टीचा पोहणारा असल्याने त्याचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही. त्याच्या मृत्यूमागे काहीतरी वेगळे कारण असावे त्याचा घातपात झाला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. मृत्यू झाल्यानंतर सागरला नजीकच्या बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित केल्यावर त्याला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठीही विलंब लागला. तसेच त्याचे कपडे आणि मोबाईल मिळून न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सागरचा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला..


ईतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik News : भरल्या घरात दुःखाचा डोंगर! शेततळ्यात बुडून ग्रामपंचायत महिला सदस्याचा मृत्यू, सिन्नरची घटना