Nashik Crime : नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यात बाहेरील राज्यातील टोळ्यांचाही धुडगूस पाहायला मिळत आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधून लूट करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मागील वीस दिवसांत सहा जणांना लुटणारी उत्तरप्रदेश टोळीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख 41 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


नाशिकच्या विविध भागात चोरी, लुटमारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यातच रिक्षातून प्रवास करणाऱ्या नाशिककरांना देखील चोरटे लूटत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाच्या बॅगेतून पैसे किंवा दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांचे राज्यभरात 'नेटवर्क' असून, प्रवाशांवर पाळत ठेवून चोरी केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संशयितांच्या चौकशीत तीन गुन्ह्यांचा छडा लावला असून, राज्यभरातील गुन्ह्यांची पोलखोल होण्याची चिन्हे आहेत. या टोळीकडून तीन लाख 41 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


दरम्यान रिक्षामध्ये प्रवास करताना 20 दिवसांत वेगवेगळ्या घटनांत महिला तसेच वृद्ध अशा 6 सहप्रवाशांच्या बॅगमधील वस्तू, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन संशयितांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने पुणे रोडवरील एका लॉजमध्ये ही कारवाई केली. संशयितांकडून 3 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीत ठक्कर बाजार ते सीबीएस या रिक्षा प्रवासात पाच हजार रुपयांसह सोन्याच्या दोन बांगड्या चोरीला गेल्याचा गुन्हा 14 जुलै रोजी दाखल झाला. या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणातून संशयित साजिद वाजीद अली, मुस्तकीन बुंदू पस, सोनू उर्फ मोहमद आबीद मोहम्मद हुसैन या तिघा उत्तरप्रदेशातील संशयितांना ताब्यात घेतले आहे.


एकट्या महिला आणि वृद्ध प्रवासी लक्ष्य


नवीन बसस्थाकन ते सीबीएस असा रिक्षा प्रवास करताना प्रवासी महिलेच्या बॅगमधून रक्कम व सोन्याच्या बांगड्या चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना अशा चोऱ्या करणारे संशयित पुणा रोडवरील एका लॉजमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली. पथकाने संबंधित लॉजवर छापा टाकत संशयित साजिद पिता वाजीद अली, मुस्तकीन पिता बिंदु पस, सोनू उर्फ मोहमंद आबिद पिता महमद हुसेन शेख यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता संशयितांनी रिक्षामध्ये सहप्रवासी म्हणून बसून महिला प्रवाशांच्या बॅगमधील रक्कम, सोन्याचे दागिने चोरी करत असल्याची कबुली दिली.


अशी करत होते लूट


दरम्यान संशयित टोळीमधील महिला आणि तिचा सहकारी रिक्षा थांब्यावर थांबत वृद्ध प्रवासी बसलेल्या रिक्षात सहप्रवासी म्हणून बसत असत. रिक्षातील प्रवाशाला संशयित महिला बोलण्यात गुंतवत ठेवत असे व त्याचवेळी दुसरा संशयित प्रवाशाची बॅग उघडून दागिने आणि रक्कम लंपास करत असत. रिक्षा प्रवास करताना शक्यतो रिक्षा थांब्यावरील रिक्षातच बसा, रिक्षाचा क्रमांक लक्षात ठेवा, प्रवासात कोणी बोलत असल्यास सतर्क व्हा, आपल्या बॅगा जवळच ठेवा, तसेच अनोळखी प्रवाशाकडे आपली बॅग देऊ नका, असे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी केले आहे. 


इतर संबंधित बातम्या : 


Pune Crime News : काय सांंगता? पुण्यात चक्क PMPML बसची चोरी, नेमकं काय घडलं?