Nashik Rain Update : पावसाचा दीड महिना उलटूनही अद्यापही नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक गाव, पाडे, वाडयांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने विहिरी भरल्या नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील 105 गावांसाठी 58 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून सर्वाधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा येवला तालुक्यात केला जात आहे. 


जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी (Nashik Rain) लावल्याने बळीराजा सुखावला. त्याचबरोबर पाणीटंचाईच्या  (Water Crisis) झळा देखील काही अंशी कमी झाल्या. नंतरच्या काळातही जिल्ह्यातील काही भागातं पावसाने जोर धरल्याने एकूणच नदी नाल्यांसह विहिरी देखील निम्म्यापर्यंत आल्या. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली असल्याने अनेक भागातील पाणीटंचाई कायम आहे. ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस असल्याने पाणीटंचाई जैसे थे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात टँकरद्वारे (water Tanker) करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


दरम्यान शासनाच्या माहितीनुसार आजच्या घडीला नाशिक (Nashik district) जिल्ह्यातील एकूण 105 वाड्या वस्त्यांना 58 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात 14 शासकीय तर 44 खासगी टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत . यात बागलाण तालुक्यातील 07 गावे चांदवड तालुक्यातील 16 गावे, देवळात 06 गावे, मालेगाव 18 गावे, नांदगाव 05 गावे, सिन्नर 04 गावे, तर सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा येवला तालुक्यातील 49 गावांना केला जात आहे. तर दिंडोरी इगतपुरी कळवण निफाड नाशिक पेठ सुरगाणा आणि त्र्यंबक या तालुक्यात चांगला पाऊस असल्याने एकही टँकर सुरू नाही. जिल्ह्यातील जवळपास 105 गावांना 58 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात 121 टँकर फेऱ्या केल्या जात आहे. या टँकर पाणीपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील एक लाख 31 हजार 529 नागरिकांची तहान भागविण्याचे काम सुरू आहे.


यंदा धरणसाठ्यात मोठी तफावत 


दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा पाहिला असता धरणांमध्ये 33 जलसाठा आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या 24 धरणांमध्ये सध्या 21666 दशलक्ष घनफूट अर्थात 33 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी धरणांमध्ये 80 टक्के जलसाठा होता. यावर्षी पाऊस उशिराने दाखल झाल्यानंतर सुरवातीला पाऊसाने हजेरी लावली. मात्र गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस नसल्याने धरणांची स्थिती जैसे थे असल्याचे चित्र आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या 40 टक्के जलसाठा आहे, तर मागील वर्षी या तारखेला 62 टक्के जलसाठा होता. तर कश्यपी 22 टक्के, मागील वर्षी 77 टक्के, आळंदी 06 टक्के, मागील वर्षी 100 टक्के होते. 


 


Nashik Water News: नाशिकची पाणीकपात टळली! पाणीसाठा वाढला, गंगापूर धरण 31 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 88 टक्क्यांवर