Nashik Latest News: वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींवर सुरू केलेली दडपशाही थांबवावी, पेरणी सुरू असताना ट्रॅक्टर, बैल आदी जमा करण्याचे प्रकार थांबवावे, वनदावे पात्र, अपात्र तसेच प्रलंबित असलेल्या वन जमीन कसणाऱ्यांना अडवू नये, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने वनपरिक्षेत्र कार्यालयावर शेकडो आदिवासी बांधवांनी मोर्चा काढत कार्यालयासमोर तब्बल दोन तासांहून अधिक ठिय्या मांडला. वनपरिक्षेत्र कार्यालयासमोरील नांदगाव-मनमाड रस्त्यावर भर पावसात या आंदोलकांनी रास्ता - रोको आंदोलनही केले. दरम्यान, स्थानिक अधिकारी आणि किसान सभेच्या शिष्टमंडळाशी दीर्घ चर्चेनंतर हे आंदोलन तब्बल तीन तासांनी मागे घेण्यात आले. 


शासनाने वन जमिनी धारकांच्या मागण्या मान्य करुन देखील वनजमिन प्लॉट धारकांवर होणारा अन्याय अत्याचार आणि दडपशाही तात्काळ बंद करण्यात यावी, यासाठी शिवस्फूर्ती मैदान येथून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. हातात लाल झेंडे घेवून वनविभागाच्या विरोधात या मोर्चात घोषणाबाजी करत वनजमिनी धारक आदिवासी बांधव हे शेकडोच्या संख्येने सहभागी झाले. हा मोर्चा महात्मा फुले पुतळा, गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुनी तहसील कचेरी समोरून शनिमंदिर मार्गे वनपरिक्षेत्र कार्यालय येथे नेण्यात आला. कार्यालयासमोरील नांदगाव-मनमाड या रस्त्यावरील दोन्ही बाजूने येणारी वाहने अडवत भर पावसात या आंदोलकांनी रास्ता-रोको आंदोलन केले. त्यानंतर कार्यालयाच्या आवारात घुसून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. 


यावेळी झालेल्या चर्चेत वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींवर सुरू केलेली दडपशाही थांबवावी, पेरणी सुरू असताना ट्रॅक्टर, बैल आदी जमा करण्याचे प्रकार थांबवावे, वनदावे पात्र, अपात्र आणि प्रलंबित असलेल्या वन जमीन कसणाऱ्यांना अडवू नये, दाखल झालेल्या दाव्यांची स्थळपाहणी होणे गरजेचे आहे, ते पहिले करा, अशी मागणी  किसान सभा आंदोलकांकडून करण्यात आली. 


या मागणीवर सकारात्मक विचार करत वनजमिनी दावे फाईल तपासून पाहणार आहोत. त्यानंतर पट्टे देण्याचे काम होईल, खात्री केल्याशिवाय कोणीही त्रास देणार नाही, माहिती घेवून रेकॉर्ड तयार होईल, नवीन कोणीही अतिक्रमणे करू नका. पुढील दोन दिवसांत वनजमिनींचे स्थळ पंचनामे करण्यात येतील, असे आश्वासन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस.म्हेत्रे आदींकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आज झालेल्या आंदोलनाची दखल घेवून पुन्हा वन जमिनी कसणाऱ्यांना वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्रास झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.


ही बातमी वाचा: