Nashik HSC Exam : उत्तर महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात, कॉपी बहाद्दरांची गय नाही, केंद्र संचालकांवरही कारवाई
Nashik 12th Exam : उत्तर महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात, कॉपी बहाद्दरांची गय नाही, केंद्र संचालकांवरही कारवाई
Nashik Division HSC Exam : आजपासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) सुरुवात झाली असून नाशिकसह विभागात 1 लाख 62 हजार 631 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर जवळपास 256 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय धुळे, जळगावमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून अतिसंवेदनशील केंद्रावर पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.
आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात जवळपास 108 केंद्रावर 74 हजार 780 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे, महिला पथकांचा देखील समावेश असणार आहे.
जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून 47 हजार 214 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. जवळपास 76 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे परीक्षा केंद्रावर पन्नास मीटरच्या आत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशात बंदी राहणार आहे. पेपर सुरु असताना झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तर पत्रिकांचे गठ्ठे ठेवण्यासाठी जवळपास 17 स्ट्रॉंग रुम तयार करण्यात आले आहेत. परीक्षा साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे जीपीएस लोकेशन घेतले जाणार असून ज्या परीक्षा केंद्रावर जास्त कॉपीचे प्रकार घडतील, त्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला असून या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ त्या ठिकाणी पोलीस आणि इतर अधिकारी पोहोचणार आहेत.
धुळे जिल्ह्यात अकरा अतिसंवेदनशील केंद्रे
धुळे जिल्ह्यात (Dhule) बारावीची परीक्षेला आजपासून सुरुवात होत असून परीक्षेसाठी 45 केंद्र असून यातील 11 केंद्र ही अति संवेदनशील जाहीर करण्यात आलेले आहेत. धुळे शहरात दोन, धुळे तालुक्यात दोन, साखळीमध्ये एक निजामपूरमध्ये दोन, सोनगीरमध्ये दोन, शिरपूर एक आणि शिंदखेडा एक अशा 11 अतिसंवेदनशील केंद्रांचा समावेश आहे. या अति संवेदनशील केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त राहिल. तसेच प्रश्नपत्रिका या कस्टडीपासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोलिस बंदोबस्तातच नेण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी दिली. या परीक्षेसाठी जवळपास 23 हजार 889 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या 50 मीटर अंतरावर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. 50 मीटरच्या आत कोणी प्रवेश केल्यास पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. धुळे जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेकरता जवळपास सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा दरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी यावर्षी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आले असून आठ ठिकाणी स्ट्रॉंगरुम तयार करण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान
नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु झाली असून, परीक्षेसाठी 16 हजार 748 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीसाठी 27 मुख्य परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या सक्त सूचना बोर्डाकडून प्राप्त झाल्या असून, 75 बैठे तर 6 फिरते पथक नेमण्यात आले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्यापीठस्तरीय व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समिती अंतर्गत पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील 1400 कर्मचारी बेमुदत बंदमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे सोमवारी प्राचार्यांना कुलूप उघडावे लागले तर प्राध्यापकांना ही काही कामे करावी लागली. तसेच विद्यार्थ्यांकडून साफसफाईची कामे करावी लागली आहे.