Nashik Shivsena : नाशिकमधून संजय राऊत माघारी फिरताच राजकीय भूकंप, ठाकरे गटाचं डॅमेज कंट्रोल ठरलं अपयशी
Nashik : संजय राऊतांना नाशिकमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यात अपयश आले आहे.
Nashik Shivsena : नाही नाही म्हणता अखेर शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला (Thackeray gat) मोठे खिंडार पडले असून तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात (Shinde sena) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे नाशिक दौऱ्यावर आलेले संजय राऊत (Sanjay Raut) मुंबईला माघारी फिरताच इकडे ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काल रात्री ठाकरे गटातील नगरसेवकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, खासदार हेमंत गोडसे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे गटातील माजी नगरसेवक अजय बोरस्ते यांच्या सह रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुदाम ढेमसे, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, प्रताप मेहरोलीया यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सचिन भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिकमधून माघारी फिरताच सेनेला याठिकाणी मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिक ठाकरे गटाशी सख्य राखून असलेले संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन डॅमेज कंट्रोल रोखले. मात्र काही दिवसांपासून ठाकरे गटात अस्वस्थता होती. काही माजी नगरसेवक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊतांनी नाशिक दौरा केल्यानंतर ही चर्चा काही काळ थांबलेली होती. त्यानंतर काल परवाच संजय राऊत हे पुन्हा दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांशी बैठका घेत विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेश केलेले अजय बोरस्ते यांची भेट घेत वैयक्तिक चर्चा केली होती. मात्र संजय राऊत माघारी फिरताच प्रवेशाच्या हालचाली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातील मोठा गट फोडण्यात शिंदे गटाला अखेर यश आल्याचे म्हटलं जात आहे.
एकीकडे संजय राऊत हे मागील दोनदा नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आले होते. मात्र त्यांचं हे डॅमेज कंट्रोल सपशेल अपयशी ठरल्याचे या प्रवेश सोहळ्यातून दिसून आले आहे. 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असून यामध्ये संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी भेट घेतलेले अजय बोरस्ते हे देखील असल्याने ठाकरे गटात मोठे भगदाड पडले आहे. नाशकात दोन आमदार आणि एक खासदार आणि एक नगरसेवक या शिवाय शिंदे गटाला काही हाती लागले नव्हते. नाशिकचे सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक आजी-माजी नेते उद्धव ठाकरेंसोबत मशाल घेऊन उभे होते. नाशिकमध्ये शिंदे गटात एवढी खास इनकमिंग झाली नसल्याने उघड नाराजी आमदार सुहास कांदे यांनी बोलून दाखवली होती. मात्र आता नाशिक मधील 11 नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यांनी काल मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.