(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिक जिल्ह्याने गाठला 100 कोटींचा पल्ला, नरेगा अंतर्गत सर्वाधिक निधी खर्च
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (Mahatma Gandhi Rojgar Yojna) हमी योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Nashik News : प्रत्येकाच्या हाताला काम देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (Mahatma Gandhi Rojgar Yojna) हमी योजनेस नाशिकमध्ये (Nashik) चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण 2022-23 या आर्थिक वर्षात 27.22 लाख मजुरांची निर्मिती करुन 101 कोटी इतका निधी खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्याचा नरेगामध्ये तिसऱ्या टप्प्यात समावेश असून त्याची अंमलबजावणी 2008 पासून सुरु आहे. मागील 15 वर्षातील हा सर्वाधिक खर्च यंदाच्या वर्षी झाला आहे.
'मागेल त्याला काम' या तत्वावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील कुटुंबातील व्यक्तींना एका आर्थिक वर्षात केंद्रीय निधीतून 100 दिवसांची रोजगाराची हमी दिली जाते. नाशिकमध्ये देखील अनेक मजुरांना रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार मिळतो आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात नाशिक नरेगाने भरीव कामगिरी केली आहे. याआधी सर्वाधिक खर्च हा 2018-19 या वर्षात झालेला असून तो 75 कोटी इतका होता. 2022-23 या आर्थिक वर्षात 101 कोटी खर्च करुन आतापर्यंतचा सर्वाधिक खर्चाचा उच्चांक करण्यात आलेला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 45 हजार 375 कामे हाती घेऊन 16 हजार 268 कामे पूर्ण करण्यात आलेली असून उर्वरित 29 हजार 107 कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात मालेगाव, नांदगाव, बागलाण, येवला, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यात सर्वांधिक कामकाज झालेले आहे.
नाशिक महसूल विभागात एकूण 5 जिल्हे असून यात अहमदनगर मध्ये 87 कोटी, धुळे 36 कोटी, नंदुरबार 69 कोटी, जळगाव 96 कोटी निधी खर्च हा खर्च करण्यात आला आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 101 कोटी रुपयांचा निधी हा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे निधी खर्चात नाशिक जिल्हा हा विभागात अव्वल ठरला आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील नरेगा कामांबाबत स्वतंत्र बैठका घेवून जलसंधारण कामे व जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत बांधण्याबाबत निर्देशीत केलेले होते. मंत्री भारती पवार यांनी दिशा समिती बैठकीत नरेगा योजनेबद्दल आढावा घेवून योजना प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये राबविणेबाबत व जास्तीत जास्त कामे हाती घेणेबाबत निर्देश दिलेले होते. तर 800 कामे एकाच दिवशी सुरु करण्यात आली होती. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 27.22 लक्ष मनुष्यदिवस निर्मिती करून 101 कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
नरेगाचं काम कसं चालतं?
ग्रामसभेने आराखडा व लेबर बजेट मंजूर केल्यानंतर तो तालुका स्तरावर एकत्रित करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये मंजुर करण्यात येतो. आराखडा मंजुरीनंतर कामांचा सांकेतांक तयार करणे, सर्वेक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मंजुरी देणे, प्रशासकीय मंजुरी देणे, कार्यारंभ आदेश देणे व Geo tagging करून प्रत्यक्षात कामे सुरु करण्यात येतात. यात ग्रामपातळीवरील ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, सरपंच, तांत्रिक अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, उप अभियंता, लेखाधिकारी, गट विकास अधिकारी तसेच यंत्रणा स्तरावर तहसीलदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते.
नरेगा अंतर्गत अशी घेतली जातात कामे...
नरेगा अंतर्गत 67 कामे वैयक्तिक स्वरूपाची व 197 कामे सार्वजनिक स्वरूपाची असे एकूण 264 कामे हाती घेण्यात येतात. वैयक्तिक स्वरुपाच्या कामात वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठे, कुक्कुटपालन शेड, बांधावर फळबाग लागवड, जुनी भात खाचरे दुरुस्ती, शोषखड्डे, वैयक्तिक शौचालय, शेततळे, दगडी बांध, बांधावर वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, तुती लागवड, विहीर पुनरर्भरण, नॅडेप खत, रेशीम लागवड इत्यादी कामांचा समावेश होतो. तर सार्वजनिक कामांमध्ये रस्ते तयार करणे, सार्वजनिक शौचालय, पेव्हर ब्लॉक, सिमेंट नाला बांध, भुमीगत गटारी, खेळाचे मैदान, सलग समतल चर इत्यादी कामे हाती घेण्यात येतात.