Fortified Rice : गैरसमज टाळा : फोर्टीफाईड तांदुळ आरोग्यासाठी गुणकारी, 'या' आजारांवर फायदेशीर
Fortified Rice : नाशिक (Nashik) जिल्ह्यात फोर्टीफाईड (Fortified Rice) तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे.
Fortified Rice : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून देशात ॲनिमिया मुक्त (Anemia) व आरोग्यदायी भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने थॅलेसेमिया, सिकेल सेल (sickle cell) व ॲनिमिया या आजारांना संवेदनशील असलेल्या लोकसंख्येला फोर्टीफाईड (Fortified Rice) तांदुळ वितरीत करण्यात येत असून नागरिकांनी या तांदळाचा आपल्या आहारात समावेश करावा, असे आवाहन भारत सरकार, सार्वजनिक वितरण प्रणालीचे संचालक विवेक शुक्ला यांनी केले आहे.
आज नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे थॅलेसेमिया, सिकेल सेल व ॲनिमिया या आजारांना संवेदनशील असलेल्या लोकसंख्येला फोर्टीफाईड तांदुळ वितरीत करण्याबाबत शंकांचे निरसन करण्यासाठी अर्धादिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संचालक शुक्ला बोलत होते. यावेळी बोलतांना सार्वजनिक वितरण प्रणालीचे संचालक शुक्ला म्हणाले की, थॅलेसेमिया, सिकेल सेल व ॲनिमिया या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकस आहारातून शरीर सुदृढ बनविणे आवश्यक आहे, त्यामुळे शासनस्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांच्या दैनंदिन आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करण्यासाठी फोर्टिफाईड तांदळाची निर्मिती करण्यात आली आहे. हा तांदुळ शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आला असून तज्ज्ञ व्यक्ती व नामांकित संस्थांनी याला मान्यता दिली आहे.
या शिबीरात भारतीय खाद्य मंडळ विभागाचे उपमहाप्रबंधक अर्धदीप रॉय, पार्थ फाऊन्डेशनचे निलेश गंगावरे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तज्ज्ञ र्मादर्शक म्हणून डॉ. रेणूका मेंहदे व डॉ. हेमांगिनी गांधी यांनी थॅलेसेमिया, सिकेल सेल व ॲनिमिया या आजाराची माहिती देत काय खबरदारी घ्यावी याबाबत माहिती दिली. तसेच या आजाराचे रूग्ण, गर्भवती महिला व बालकांच्या दैनंदिन आहारात रानभाज्या पालेभाज्या व पोषणयुक्त आहाराचा समावेश करावा, याबाबत आवाहनही केले आहे.
या आजारांवर गुणकारी
त्याअनुषंगाने आता शासन स्तरावर पुरेशा प्रमाणात या तांदळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी या तांदळाच्या वापराबाबत कोणताही गैरसमज न बाळगता याचा आहारात समावेश करणे गरजेचे असून हा तांदुळ खाल्ल्याने कोणतेही दुषपरिणाम होणार नाही, असेही यावेळी व्यवस्थापक श्री. शुक्ला यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी बोलतांना जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील थॅलेसेमिया, सिकेल सेल व ॲनिमिया या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी फोर्टिफाईड तांदुळ वापराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून स्थानिक यंत्रणांनी व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. तसेच दैनंदिन आहारात रानभाज्या, पालेभाज्या, पारंपारिक खाद्य पद्धती यांचे आरोग्य विषयक महत्व नागरिकांना पटवून द्यावेत, असेही त्यांनी यावेळी उपस्थितीत महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांना सांगितले आहे.