Nashik News : राज्यातील मुलींसाठी स्वतंत्र राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी नाशिक (Nashik) शहरात उभारण्यात आली. त्यानंतर जागांचा कोटा निश्चित करण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात 152 विद्यार्थिनींच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून तीस मुलींची निवड केली जाणार असून त्यानंतर 15 जूनपर्यंत या प्रशिक्षण वर्गाची पहिली बॅच सुरू होईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) (NDA) मुलींना प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत मुलींसाठी भारतात पहिली शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिकला पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. या संस्थेत प्रथम सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून यासाठीची अर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या मुलाखती पार पडल्या. यातून आता सुरवातीच्या तीस मुलींची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मुलींचे एनडीएतील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी ही सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था (Military Pre-Service Training Institute) साधारण जून 2023 पासून सुरू होणार आहे.
नाशिक शहरातील त्र्यंबकरोडवरील माजी सैनिकांच्या पाल्यांचे वसतिगृह असलेल्या इमारतीला जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 100 विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या सुसज्ज अशा या इमारतीत सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था कार्यान्वित केली होणार असल्याचे भुसे म्हणाले. मैदानी चाचण्या, शारीरिक व्यायाम व सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षणाचे धडे निवड झालेल्या तीस मुलींना महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून सुमारे राज्यभरातून 3,900 विद्यार्थिनींनी सैनिकी सेवा प्रशिक्षण पूर्व परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 3,300 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी 152 विद्यार्थिनींनी विशेष गुणवत्ता यादीत स्थान पक्के केले आहे. यापैकी प्रत्येकी तीस मुलींना टप्प्याटप्प्यांत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती भुसे यांनी यावेळी दिली.
छ. संभाजीनगरमध्ये मुलाखती
दरम्यान अर्ज छाननीनंतर पूर्व परीक्षा घेण्यात आली. यातून जवळपास 152 विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत प्रवेश केला आहे. आता गुणवत्ता यादीतील 152 मुलींच्या मुलाखती छत्रपती संभाजीनगरमधील प्रशिक्षण संस्थेत झाल्या. मुलाखतीत यशस्वी झालेल्या तीस विद्यार्थिनींची निवड निवासी प्रशिक्षण सत्रासाठी पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शिक्षक व प्राध्यापक पदासाठी भरती
जिल्हा सैनिक कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील मुलींना UPSC (NDA/NA) परीक्षा तयारीसाठी सात विषयांसाठी शिक्षक व तज्ज्ञ प्राध्यापक कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक उमेदवारांनी यांनी 10 मे, 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इंगजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या सात विषयांसाठी शिक्षक व प्राध्यापक पदांची भरती करण्यात येणार असून या सर्व पदांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर अथवा डॉक्टरेट अशी शैक्षणिक पात्रता आहे.