Nashik News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्याला ऑगस्टपर्यंत पुरू शकतो, इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याने तुर्तास पाणी कपात (Water Cut) करण्याची आवश्यकता नसल्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी म्हटले. तसेच नाशिककरांनी विशेषत: शहरी भागात पाण्याचा विनाकारण होणारा अपव्यय टाळवा, जेणेकरून पाणीकपातीचे संकट जून अगोदर ओढावणार नाही. नाशिक शहरात सध्यातरी पाणीकपात करण्याची गरज वाटत नाही, असे त्यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.


नाशिक शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील (Nashik District) मध्यवर्ती सभागृहात दादा भुसे यांनी पाणीटंचाईबाबत (Water Crisis) नियोजन व व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली. अल निनोच्या संकटामुळे पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असून जून व जुलैमध्ये जिल्ह्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे आतापासून शासनाच्या आदेशानुसार पाणी व्यवस्थापन व नियोजनावर भर दिला जात आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याची तहान भागेल इतका पाणीसाठी धरणांमध्ये सध्या उपलब्ध आहे; मात्र उन्हाचा तडाखा आगामी दिवसांत वाढल्यास वेगाने बाष्पीभवनही होऊ शकते. यामुळे पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची व सरकारी यंत्रणांचीसुद्धा जबाबदारी असल्याचे भुसे यांनी सांगितले. 


दरम्यान पाणी कपातीचा आतापासून निर्णय घेणे अधिक घाईचे होईल, जिल्ह्यात धरणांमधील पाणीसाठा (Nashik Water Dams) बघता चिंता करण्यासारखी स्थिती अद्यापतरी नाही, यामुळे नाशिककरांनी काळजी न करता पाण्याचे महत्त्व लक्षात घेत सतर्कपणे आवश्यक तितकाच वापर करावा, असे आवाहनही भुसे यांनी केले. जेणेकरून पाणीकपातीची वेळ लवकर येणार नाही. मात्र नाशिकसह जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा विनाकारण अपव्यय कोठे होणार नाही, याबाबत अधिकाधिक सतर्क राहण्याची सूचना जिल्हा परिषदेसह नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


...तर एक दिवस पाणीकपात!


दरम्यान पुढील काळात पाऊस लांबणीवर गेला किंवा दोन पावसांमध्ये खंड पडत असल्याचे चिन्हे दिसल्यास उपलब्ध पाणीसाठा व वापराची गरज लक्षात घेता त्यावेळी नाशिक महापालिकेकडून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाऊ शकते; मात्र हे करताना नाशिककरांना पूर्वकल्पना देऊन नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, असेही भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नाशिक शहरात स्मार्टसिटीअंतर्गत ठिकठिकाणी खोदकाम सुरू असून शहरात तीन ते चार ठिकाणी मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या जेसीबीच्या धक्क्याने फुटल्या आणि हजारो लीटर पाण्याचा अपव्यय झालेला पाहावयास मिळाला. यामुळे स्मार्टसिटीने विकासकामे करताना अधिकाधिक खबरदारी घ्यावी, खोदकामात जलवाहिन्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना बैठकीत करण्यात आल्या.