Nashik Water Crisis : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे. डोंगर वाटेतून दाट झाडी झुडपातून  जंगलातून एक/दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर कपारीतून झिरपणारे थेंब थेंब पाणी टपकताना दिसते. तिथंच महिलाचा पाण्याचा शोध थांबत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील कुरुंगवाडी परिसरात पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरावं लागत आहे. 


'धरण उशाला कोरड घशाला', अशी एक म्हण मराठीमध्ये प्रचलित आहेत. पण नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या अनेक भागात दरवर्षी या म्हणीचा प्रत्यय येतोच. आता इगतपुरी तालुक्यातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी (Water Crisis) भर उन्हामध्ये वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. एक हंडा भरण्यासाठी महिलांना पाऊण तास थांबावं लागतं आणि याशिवाय या पाण्यापर्यंतची वाट चालत असताना वन्य प्राण्यांचा धोका पत्करावा लागतो. नाशिक जिल्ह्यातल्या सर्वाधिक जीवनाचा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीचा तालुका अशी इगतपुरीची ओळख आहे. पण भावली धरणापासून किलोमीटरवर कुरुंदवाडी नावाचं गाव आहे. जिथल्या मारुती वाडीवस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाह. खरंतर कृषी विभागाच्या बिरसा मुंडा योजना अंतर्गत गावात दोन विहिरी बांधण्यात आल्या खऱ्या पण या विहिरींचं पाणी पिण्यायोग्य नसल्याने पाणी प्यायाल्यानंतर तर घशाला त्रास होतो, लहान मुलं आजारी पडतात अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ही अशी वनवण करावी लागते.


दरम्यान शहरात (Nashik City) दिवसातून एक वेळेस पाणी आले नाही, तरीही जीव कासावीस होतो. मात्र दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी या महिला ओबडधोबड वाट तुडवीत थेट डोंगराच्या मध्यावर पोहचत आहेत. इगतपुरी तालुक्यातील कुरंगवाडीच्या मारोतीवाडी वस्तीत राहणाऱ्या महिला रोज पहाटे चार पाच वाजता  घरातून पाण्यासाठी  बाहेर पडतात. चार पाच तासानंतर घरी परत जातात. कपारीतून थेम्ब थेम्ब पाणी खाली पडते. एखादा हंडा भरण्याएवढे पाणी जमा झाल्यावर महिलांच्या रांगेनुसार हंडा भरला जातो. विशेष म्हणजे इगतपुरी तालुका नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा आणि सर्वाधिक धरणाचा जिल्हा आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात इथे धो धो पाऊस पडतो. मात्र मार्च महिन्यापासूनच नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती सुरु होते. या गावाचं दोन्ही बाजूला काही किलोमीटर अंतरावरच धरण आहेत.


काट्या कुट्याचा तुडवत रस्ता.... 


मारोतीवाडी वस्तीवरून पाण्यासाठी निघालेल्या महिलांना रोजच जंगलातून वाट काढत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून स्वतःला सावरत डोंगरावर पोहचत असतात. या सर्व महिला एकत्रितपणे पाणी भरण्यासाठी येतात आणि समूहाने  माघारी जातात. त्यामुळे डोक्यावर दोन दोन हंडे  घेऊन जाणाऱ्या महिलांची रांग दुरवर दिसते. ज्या मार्गावर केवळ चालणे अशक्य असताना अशाप्रकारे ओबडधोबड जंगली वाट तुडवीत लहान मुली, वृद्ध महिला डोक्यावर हंडे घेऊन जातात. पाण्यातच सगळा वेळ जात असल्यानं घरची काम खोळंबुन पडत असल्यानं घरी जातात आणि दुपारी संध्याकाळी पुन्हा पाणी भरण्यासाठी येतात.


पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? 


देश पारतंत्र्यातून मुक्त झाला, मात्र या आदिवासी बांधवांची पाण्याच्या समस्येपासून सुटका नाही. पिढ्यानपिढ्या याच परिस्थितीला नागरिक तोंड देत आहेत. कृषी विभागाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत गावात दोन विहीर बांधण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे पाणी पिण्यायोग्य नाही, पाणी प्यायल्याने घशाला  त्रास जाणवतो. लहान मुले आजारी पडतात. त्यामुळे या विहिरीकडे कोणी फारसे फिरकत नाही. साडेतीनशेहुन अधिक लोकसंख्या असल्याने पेय जल योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र नियम अटींमध्ये तो प्रश्न मार्गी लागत नाही. तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रगतीपथावरील योजना तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.