(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : इग्नू विद्यापीठातून शिक्षण घेताय? विद्यावेतनासह नोकरीही मिळणार, नाशिक जिल्हा परिषदेचा उपक्रम
Nashik News : इग्नू (IGNOU) विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) माध्यमातून कमवा व शिका योजना राबविण्यात येणार आहे.
Nashik News : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातून कमवा व शिका योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. यामुळे अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. याच धर्तीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातून व जिल्ह्याबाहेरील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीअभावी पुढील शिक्षण घेता येत नाही. वसतिगृह, जेवणाखाण्याचे व शैक्षणिक शुल्क कसे भरायचे, या सारखे अनेक प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांपुढे उभे राहतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरु झालेल्या कमवा व शिका योजनेमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हे प्रश्न काही अंशी सुटले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2022-23 या वर्षांपासून 'कमवा आणि शिका' ही ज्ञान कौशल्यावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक योजना राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान-कौशल्ये आत्मसात करुन देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या (बी. बी. ए. (सेवा व्यवस्थापन) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून 20 टक्के मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन देण्याचीही नाविन्यपुर्ण योजना राबविली जाणार आहे.
या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीं आठ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये आणि शेवटच्या वर्षांसाठी दहा हजार रुपये विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठी खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमहा चार हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल. तसेच सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षांच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची BBA (Service Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.
इथे करा अर्ज
या योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै, 2022 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/zpnashikibba2022 ही ऑनलाईल लिंक समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या वतीने उपलबध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 18 ते 22 वर्षे वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.