Nashik NMC : नाशिक मनपा इन ॲक्शन, सहाही विभागात 'मिशन अतिक्रमण'
Nashik NMC : नाशिक मनपाने (Nashik NMC) अनधिकृत अतिक्रमण विरोधात (Encroachment) धडक मोहीम सुरु केली असून आता एकाचवेळी सहाही विभागात अतिक्रमण पथक मोहीम राबविणार आहे.
Nashik NMC : गेल्या काही दिवसांपासून नाशिक मनपाने सातपूर परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवल्यानंतर आता सहाही विभागात एकाचवेळी अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अतिक्रमणात येणाऱ्या व्यावसायिकांचे, टपरीधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कामाचा, पाहणीचा चांगलंच धडाका लावला आहे. विशेष म्हणजे पवार यांनी शहर स्वच्छतेसह अतिक्रमण मुक्त शहर करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. याची सुरुवात त्यांनी गंगाघाट परिसरातुन केली आहे. हीच मोहीम अता शहरभर फिरणार असून त्या माध्यमातून शहरातील सहाही विभागांत एकत्रित धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख करुणा डहाळे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे प्रशासक ताठ मनपा आयुक्त रमेश पवार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शहराचा अभ्यास करत थत रिक्षातून गोदाघाटावर फेरफटका मारला. यावेळी सुमारे तीन तास नाशिक शहरातील विविध भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत गंगाघाट, रामकुंड तसेच पंचवटी भागातील हातगाड्या तसेच बेशिस्त हॉकर्सना सूचना देत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महापालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन माेडवर येऊन गंगाघाट परिसरात मोहीम राबविण्यात येऊन संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त केला. त्याठिकाणी फक्त पूजा साहित्य विक्रेत्यांना परवानगी दिली असून इतर खाद्यपदार्थ तसेच साहित्य विक्री करणाऱ्यांनी दुकाने थाटली तर थेट जप्तीची कारवाई होत आहे. तर या ठिकाणी महापालिकेचे पथक कायम असून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत आहे.
सहा विभागात संयुक्त कारवाई नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व तसेच नवीन नाशिक या सहा विभागांत मध्ये एकाच वेळी संयुक्त मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व ठिकाणांच्या गाड्या जेसीबी मशीन तसेच अधिकारी व सेवकांचा लवाजमा वापरण्यात येणार आहे. दरम्यान या अतिक्रमण मोहिमेची सुरुवात गंगापूर रोड वरून करण्यात येणार आहे. यानंतर हळूहळू शहरभर ही मोहीम सुरूच राहणार आहे. यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त मिळावा अशी मागणी देखील महापालिकेच्या वतीने पोलीस दलाकडे करण्यात आली आहे.
अति. आयुक्त तथा अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे म्हणाल्या कि, गंगाघाट परिसरात आता कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होत नाही, त्या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. आता शहरातील सर्व विभागांची एकत्रित संयुक्त अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात जेहान सर्कल पासून होणार आहे.