Rajya Sabha Election 2022 : नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, 'विजय निश्चित होता', आमदार सीमा हिरेंची प्रतिक्रिया
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपकडून तिन्ही उमेदवार विजयी झाल्याच्या निमित्ताने नाशिकच्या (Nashik) भाजप कार्यालयात फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला.
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून, भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपकडून तिन्ही उमेदवार विजयी झाल्याच्या निमित्ताने नाशिकच्या भाजप कार्यालयात फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेली लढत शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. त्यात भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत भाजपकडून या विजयाचे निमित्ताने नाशिक येथील वसंतस्मृती येथे फटाके फोडत विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
नाशिक भाजपच्या वतीने आज एन डी पटेल रोडवरील भाजप कार्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवून तोंड गोड करत जल्लोष केला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि 'देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो'ची घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाची जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीतून तसेच त्यांच्या बोलण्यातून आपला विजय निश्चित होता अशा प्रतिक्रिया देखील भाजपा आमदार सीमा हिरे यांनी दिली. तसेच राज्यसभाच नाही तर विधान परिषदेच्याही जागा भाजपच जिंकेल असा विश्वास सिमा हिरे यांनी पत्रकारांशी बोलतांना यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजप आमदार सिमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले...
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. या निकालाने धक्काही बसला नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुणे येथे शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना म्हटले की, मतांची संख्या पाहिली शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची मतं फुटली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना एक मत अतिरिक्त मिळाले, याची मला कल्पना असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.