(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Agriculture News : नाशिकमध्ये लवकरच कृषी टर्मिनल मार्केट, सैय्यद पिंप्रीत 100 एकरावरील प्रकल्प
Nashik Agriculture News : नाशिकमध्ये (Nashik) लवकरच कृषी टर्मिनल मार्केट (Agricultural Terminal Market) साकारण्यात येणार असून सैय्यद पिंप्रीच्या १०० एकरवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
Nashik Agriculture News : शरद पवार (Sharad Pawar) हे केंद्रीय कृषी मंत्री असतांना त्यांनी महाराष्ट्रासाठी 03 कृषी टर्मिनल मार्केट मंजूर केले होते. नाशिक (Nashik) हा कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे येथे भाजीपाला, फळे व अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. सन 2009 मध्ये नाशिक येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नाशिक विकास पॅकेज मंजूर करून घेतले होते. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नाशिक येथे अद्ययावत कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याच्या प्रस्तावास नाशिक विकास पॅकेज अंतर्गत 2009 मध्ये शासनाने मान्यता दिलेली आहे. आता या कामाला पुन्हा वेग आला असून लवकरच नाशिक मध्ये कृषी टर्मीनल मार्केट साकारले जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षमंत्री तथा नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आज मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात याबाबत बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी नाशिक येथे कृषी टर्मिनल मार्केट उभारणीसाठी मौजे पिंप्री सय्यद, ता.जि. नाशिक येथील गट क्र. 1654 मधील शासन मालकीच्या जागेपैकी 100 एकर जमीन हस्तांतरीत करून पुढील कार्यवाहीस सुरवात करावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आगामी काळात नाशिक येथील टर्मिनल मार्केट विकसित करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर कृषी टर्मिनलचे काम सुरू झाले पाहिजे. कृषी मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नाशिकमध्ये अद्यावत टमिर्नल मार्केट उभारण्यात येणार आहे. याचा फायदा फळभाज्या, अन्नधान्य, पोल्ट्री पदार्थ व दुग्धजन्य पदार्थांना होईल.
याबद्दल माहिती देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, टर्मिनल माकेर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लिलाव पद्धत , कोल्ड स्टोरेज, बँकिंग, टपाल, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी सेवा असतील. नाशिक टर्मिनल मार्केटमुळे भाजीपाला आणि फळ उद्योगाला नवसंजीवनी मिळेल. या मार्केटमध्ये 70 टक्के फळे आणि भाजीपाला, 15 टक्के अन्नधान्य व 15 टक्के पोल्ट्री, मांस, दुग्धजन्य पदार्थांची हाताळणी अपेक्षित आहे. सध्या नाशिकमध्ये उत्पादित शेतमालाला देशासह परदेशातदेखील मोठी मागणी आहे. मात्र सुविधांच्या अभावामुळे निर्यातीचे प्रमाण वाढत नाही. भाजीपाला, फळे नाशवंत असल्याने व्यापारी भाव पाडून खरेदी करतात. साठवणुकी अभावीही 30 ते 40 टक्के मालाचे नुकसान होते. यावर तोडगा म्हणून टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. याचा मोठ्याप्रमाणात फायदा हा शेतकऱ्यांना होईल.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शेतमाल थेट या ठिकाणी यावा असा उद्देश असून, तो स्थानिक बाजारपेठापर्यंत पोहचवण्या बरोबरच त्याची थेट निर्यात व्हावी अशी अपेक्षा आहे. या कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतमाल आणि फलोत्पादनाच्या विक्रीच्या प्रचलित पद्धतीमुळे होणारे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांचा थेट बाजारांशी संपर्क प्रस्थापित करून उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करून देता येईल व मध्यस्थांची साखळी कमी होईल. फलोत्पादन पणन व्यवस्थेत आधुनिक साधनांचा उपयोग करून व खाजगी गुंतवणूकदारांच्या सहाय्याने शीतसाखळी निर्माण करता येईल.