Nashik News : तीन वर्ष गावकऱ्यांची मेहनत, डीपी बसवली अन् घराघरात पाणी यायला लागलं!
Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावाने तीन वर्ष मेहनत घेऊन घराघरात पाणी पोहचवलं आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) अनेक भागात पाणी प्रश्न हा दरवर्षीं चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आजच्या घडीला गावकरी लोकप्रतिनिधींवर विसंबून न राहता स्वतः मेहनत गेहून गावाला पाणीदार (Water Supply) कसं करता येईल याचं नियोजन करत असतात. अशाच एका गावाने तीन वर्ष मेहनत घेऊन घराघरात पाणी पोहचवलं आहे.
गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ , सुरगाणा आदी तालुक्यातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. अद्यापही अनेक गावे तहानलेली असून काही संस्था, ग्रामपंचायत च्या माध्यमातून पाणी पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच त्र्यंबक तालुक्यातील वाळीपाडा या गावातील तहान भागविण्यात सोशल नेटवर्कींग फोरमला यश आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावाच्या दीड किलोमीटर परिसरात पाणी असूनही विजेअभावी हे पाणी पोहचू शकत नव्हते. मात्र गावकऱ्यांसह एसएनएफ संस्थेने तीन वर्षांपासून पाठपुरावा करत काही दिवसांपूर्वीच या गावात नवी डीपी बसवून पाणी घराघरात पोहचवले आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काही महिन्यापूर्वी त्र्यंबक तालुक्यातील वाळीपाडा या गावाचे लोक पाण्याची समस्या घेऊन एसएनएफकडे आले होते. एसएनएफ म्हणजेच सोशल नेटवर्कींग फोरम ही संस्था दुर्गम भागातील आदिवासी गावांना पिण्याचे पाणी ऊपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. वाळीपाड्यात नेहमीचीच समस्या होती, उन्हाळ्यात प्यायला पाणी नव्हते. पाहणी करायला गावात जायचे ठरवले तर गावात जायला रस्ता नव्हता. गावापासूनच दिड किलोमीटरवर एक पाण्याचा सोर्स होता, तिथे विहीर खोदून पाईपलाईन करून आणली तर गावात बारमाही पाणी उपलब्ध होणार होते. अनेकांनी याकामी आर्थिक हातभार लावण्यासही पुढाकार घेतला. दरम्यान विहिरी जवळ 3 फेज इलेकट्रीसिटी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली. त्यासाठी डीपीची गरज होती.
दरम्यान विजेसाठी डीपीची आवश्यकता असल्याने ग्रामपंचायतने एमएसईबीकडे अर्ज केला. गावकऱ्यांनी चकरा मारणे सुरु केले. मधल्या काळात विहीर खोदून, बांधून झाली, पाईपलाईन झाली, गावात पाण्याची टाकी बांधून झाली. पण वीज काही उपलब्ध होईना. इलेकट्रीसिटी विभागाला चक्कर मारून मारून सगळे थकले पण अपयशच पदरी पडत गेले. काही ना काही कारणं देत वीजपुरवठा सतत लांबवला गेला. अधिकारी, लोकप्रतिनिधी,आमदारांकडेही यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरु होता. मात्र जवळपास तीन वर्ष या गावकऱ्यांना शासनासह लोकप्रतिनिधी वेठीस धरले.अखेर तीन वर्षांनंतर का होईना सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून गावात 3 फेज डीपी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत एनएसएफचे प्रमोद गायकवाड म्हणाले कि, पाईपलाईन टेस्टिंग, मोटार टेस्टिंग वगैरे सर्व सोपस्कार पार पडून लवकरच वाळीपाड्यात पाणी पोहोचेल ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या घटनेवरून आपल्या लक्षात येऊ शकेल कि 21 व्या शतकातही दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांचा पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी देखील किती जीवघेणे आहे. मात्र आता गावाची समस्या सुटली असून अशी अनेक गवे आहेत, जिथं काही ना काही अडचण असल्याने पाणी प्रश्न सुटत नाहीय. त्या ठिकाणी आता प्रयत्न सुरु केल्याचे ते म्हणाले.