Nashik Anandacha Shidha : डॉ. आंबेडकर जयंतीला घरोघरी गोडधोड होणार, नाशिकला रवा अन् साखर पोहचली!
Nashik Anandacha Shidha : नाशिक (Nashik) जिल्ह्यात आतापर्यंत रवा अन् साखर पोहचली असून डॉ. आंबेडकर जयंतीपर्यंत सर्वाना आनंदाचा शिधा मिळणार आहे.
Nashik Anandacha Shidha : गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa) मुहूर्तावर झोळीत आनंदाचा शिधा गोरगरिबांच्या झोळीत पडू शकला नाही. मात्र येत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला (Ambedkar Jayanti) घरोघरी गोडधोड होणार आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात आतापर्यंत रवा अन् साखर पोहचली असून लवकरच संपूर्ण किटही उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित राज्य सरकारच्या वतीने गोरगरीब कुटुंबीयांना 'आनंदाचा शिधा अवघ्या शंभर रुपयांत (Anandacha Shidha) पुरविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या घोषणेनंतर गोरगरिबांना आनंद झाला, मात्र त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. गुढीपाडव्याला काहीच मिळालं नाही. नाशिक जिल्ह्यातील सुमारे सात लाख कुटुंबीयाच्या पदरी धान्याऐवजी निराशा आली. मात्र आंबेडकर जयंतीपर्यत घरोघरी किट वाटप केले जाणार आहेत. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात रवा आणि साखर (Sugar) पोहचली असून लवकरच पामतेल, चणाडाळ हे साहित्य पोहचणार आहे. त्यामुळे हे किट आल्यानंतर लागलीच वाटपाला सुरवात होणार असल्याचे समजते आहे.
सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना दिवाळीच्या औचित्यावर 'आनंदाचा शिधा' या धर्तीवर येत्या गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीनिमित्त वाटप केला जाणार होता. नाशिक जिल्ह्यासाठी 7 लाख 82 हजार 562 शिधा जिन्नस संच पुरविले जाणार होते. याबाबतचा शासन आदेश देखील काढण्यात आला. सवलतीच्या दरात हा आनंदाचा शिधा ई-पॉस यंत्राच्या प्रणालीद्वारे वाटप करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाने निविदा प्रक्रिया राबविण्यासदेखील मान्यता दिली. त्याचा कालावधी पंधरा दिवस 21 दिवसांचा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत अन्नधान्याच्या किटची वाहने रवाना झाली असून एक दोन दिवसात ही वाहने जिल्ह्यात पोहचणार आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत तरी हा 'आनंद' शिधा मिळेल अशी आशा लाभार्थ्यांना लागली आहे.
गुढीपाडव्याचा टप्पा तर हुकला..
आनंदाचा शिधा संच अवघ्या शंभर रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या एका संचामध्ये प्रत्येकी 2 किलोप्रमाणे रवा, चणाडाळ, साखर, 1 लिटर पामतेल असेल शंभर रुपये दराने वितरित केले जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र गुढीपाडव्याचा टप्पा तर हुकला आहे, आता आंबेडकर जयंतीची नागरिकांना आस लागली आहे. सरकारने वेळेवर शिधा संच एकत्रीतपणे उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून लाभार्थी, दुकानदारांची गैरसोय होणार नाही. आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे मार्चअखेर दुकानांमध्ये शिधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी दुकानदारांकडून करण्यात येत आहे.
....आता आंबेडकर जयंतीकडे लागले लक्ष
गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाचा शिधा मिळाला नाही. यामुळे आता शासनाच्या घोषणेप्रमाणे लाभार्थीना आंबेडकर जयंतीची आशा लागली आहे. आनंदाचा शिधा वाटप आंबेडकर जयंतीपूर्वी होईल, असा आशावाद केला जात आहे. या शंभर रुपयात रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो, एक लिटरची पामतेलाची पिशवी असे किट दिले जाणार आहे. आनंदाचा शिधा मिळेल असे फलक दुकानांमध्ये लावण्यास सांगितले. यामुळे कार्डधारकांकडून सतत विचारणा होऊ लागली. गुढीपाडवा संपून गेला, मात्र शिधा संच जिल्ह्यातील दुकानामध्ये पोहचू शकले नाहीत. ग्राहकांच्या रोषाचा सामना दुकानदार करत आहेत. आनंदाचा शिधा आला नाही. तर मग काही फलक का लावले? असा उलटप्रश्नही अनेकांनी दुकानदारांना केला.