Nashik Sanjay Raut : मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, एकटाच फिरतो, लढतो; संजय राऊतांचा टोला
Nashik Sanjay Raut : संजय राऊत एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
Nashik Sanjay Raut : आपल्यावर हल्ला होऊ शकतो, हे आपण गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कळवले आहे, सुरक्षा मागितलेली नाही. मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) स्कूलचा विद्यार्थी आहे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली आहे. मी सुरक्षा मागितली नाही, तरी मी एकटाच फिरतो आणि एकटाच नडतोय, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या विरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाशिकमध्ये (Nashik) असून त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपल्यावर हल्ल्याची भीती वाटते. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याची सुपारी दिली गेली आहे. फडणवीस गृहमंत्री असताना हे घडत असून राज्यात रोजच खून, दरोडे, बलात्कार होत आहेत. लोकप्रतिनिधी ही सुरक्षित नाहीत." संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, "मला सुरक्षेची गरज नाही, उलट त्यांना सुरक्षा लागली, तर मी देईल. मी एकटाच फिरतो, लढतो. गृहमंत्री पद हे जनतेला सुरक्षित करण्यासाठी हवे. फुटीर आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यासाठी नव्हे.", असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार टीका करताना ते म्हणाले की, "आपण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कळवले. सुरक्षा मागितलेली नाही. मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी आहे, रामभाऊ माळगी प्रबोधिनीचा नाही, फडणवीस यांना मी सुसंस्कृत समजत होतो, आता नाही.", अशी टीका राऊतांनी केली. मला सनसनाटी आरोप निर्माण करायची गरज नाही. उलट फडणवीस हे अत्यंत बेफिकीरपणे वागत आहेत. ते इतरांचं बुद्धीचे माप काढतात, मी त्यांच्या बुद्धीचे माप काढायला लागलो, तर गडबड होईल, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत हे नाशिकमध्ये आले असून आज ते सिन्नर तालुक्यातील एका उदघाटन सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांनी गृहमंत्री आणि ठाणे पोलिसांना दिलेल्या पत्रांनंतर खळबळ उडाली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र ठाणे पोलिसांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिले होते. त्यामुळे संजय राऊत आज नाशिकमध्ये असताना त्यांच्या सुरक्षेसाठी 3 पोलीस कर्मचारी आणि एक वाहन तैनात ठेवण्यात आले आहे. शिवाय ठाण्याचे पोलीस पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून संजय राऊत यांचा पत्राप्रकरणी जबाब घेतला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :