Nashik Bribe : अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करत 5 लाखांची सुद्धा सेव्हिंग होत नाही, मात्र दुसरीकडे सरकारी अधिकारी कुठे 30 लाख तर कुठे 15 लाखांची लाच घेताना एसीबीकडून (ACB) पकडले जात असल्याने लाचखोरी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकचा यात पहिला क्रमांक लागला आहे. 


सध्या राज्यात 01 ऑगस्ट ते 07 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे (Revnue Week) आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात विश्वास वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र याच महसूल सप्ताहात एका तहसीलदाराने केलेला पराक्रम सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरतो आहे. नाशिकचे (Nashik) तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Nareshkumar Bahiram) यांनी तक्रारदाराची गौण खनिज प्रकरणातील जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल 15 लाखांची लाच मागितली होती आणि तिच लाच स्वीकारतांना स्वतः राहत असलेल्या कर्मयोगी नगर परिसरातील मेरिडियम गोल्ड अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शनिवारी सायंकाळी एसीबीने (Nashik ACB) बहिरमला सापळा रचत रंगेहाथ अटक केली. 


त्यानंतर संध्याकाळ पासून सुरु असलेली त्यांच्या घराची झाडाझडती पहाटेपर्यंत सुरु होती. ज्यात एसीबीला 4 लाख 80 हजार रोख रक्कम, 40 तोळे सोनं आणि 15 तोळे चांदीचे दागिने आणि इतर कागदपत्रे असा जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल प्राथमिक तपासात आढळून आला आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात लाचखोरीचा विषय हा गाजला होता. ज्यात घरात 85 लाखांची रोकड सापडलेल्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ईडी चौकशी करण्याची घोषणाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विशेष म्हणजे, नाशिक दौऱ्यावर असलेले फडणवीस शनिवारी सकाळी माघारी फिरत नाहीत, तोच सायंकाळी नरेशकुमार बहिरम एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने हा चर्चेचा विषय ठरतो आहे. 


तहसीलदाराच्या घरी कोट्यवधींचं घबाड हस्तगत


नाशिक अँटी करप्शन ब्युरोची (Anty Corruption) सध्या धडाकेबाज कारवाई सुरु आहे. एकट्या नाशिक विभागातच चालू वर्षी 104 गुन्ह्यांमध्ये तब्बल 151 लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने राज्यात लाच घेण्यात नाशिक सध्या पहिल्या क्रमांकाचा विभाग बनला आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करत 5 लाखांची सुद्धा सेव्हिंग होत नाही, मात्र दुसरीकडे सरकारी अधिकारी मात्र कुठे 30 लाख तर कुठे 15 लाखांची लाच घेतांना एसीबीकडून पकडले जात असून त्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड हस्तगत केलं जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


लाचखोर एसीबीच्या जाळ्यात 


नाशिकमध्ये एका मागोमाग एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकत असले तरी मात्र दुसरीकडे लाचखोरीच प्रमाण कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विशेष म्हणजे, पोलीस खाते वगळता लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहे. त्या विभागाकडून निलंबन म्हणा किंवा ईतर सहकार्य लवकर मिळत नसल्याने पुढील कारवाई करण्यात एसीबीला अडचणी येत असल्याचंही बघायला मिळत असल्याने शासन स्तरावरून याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.


इतर संबंधित बातम्या : 


15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई