Nashik Sunita Dhangar : नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वादग्रस्त शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच (Bribe) स्वीकारताना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अशातच धनगर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश राज्याचे उपसचिव टी. वा. करपते यांनी काढले आहेत.
काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhanagar) यांना लाच घेताना अटक करण्यात आली. यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई करत एसीबीने धनगर यांच्या घरातून कोटींचे घबाड बाहेर काढल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याच्यातच नागरिकांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली. दरम्यान सुनीता धनगर यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शासन निर्णयानुसार पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत 48 तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास सरकारी सेवेतील व्यक्तींना शिक्षण निलंबित केले जाते. त्यानुसार लाचखोर सुनीता धनगर यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान नाशिक महानगरपालिका हद्दीत शिक्षण विभागाचा कारभार हा नेहमी चर्चेत राहिला आहे. शाळांकडून पालकांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता झालेली शुल्कवाढ, शिक्षकांची प्रलंबित देयके, शालार्थ संकेतांक शासकीय योजनांचा लाभ यासाठी महापालिका प्रशासनाधिकारी धनगर नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्या वादग्रस्त कारभाराविषयी उपसंचालक कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यानंतर धनगर यांच्या घराच्या झाडाझडतीत 85 लाखांची रोकड आणि 32 तोळे सोने हस्तगत करण्यात आले. कोट्यवधींची स्थावर मालमत्ताही सापडली. धनगर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी आहे.
निर्वाह व पूरक भत्ता देण्यास शासनाची मान्यता
शासन नियमानुसार त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. धनगर यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. तसेच, निलंबित असताना धनगर यांना खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसे कृत्य केल्यास निर्वाह भत्त्यावरील हक्क त्या गमावून बसतील. निलंबन कालावधीत निर्वाह व पूरक भत्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शिक्षण आयुक्तांनी कार्यवाही करावी, असेही या आदेशात म्हटले आहे. लाचखोर उपनिबंधक सतीश खरे, सुनीता धनगर हे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या धनगर न्यायालयीन कोठडीत असून आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.