Nashik Leopard : नाशिक शहरासह सिन्नर, निफाड परिसरात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह (Leopard Sight) हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. सिन्नर तालुक्यात महिनाभरात बिबट हल्ल्याच्या (Leopard Attack) दोन ते तीन घटना समोर येत असताना तालुक्यात पुन्हा एकदा बिबट हल्ल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील दापुर (Dapur Village) गावाजवळ आठ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. 


नाशिकच्या (Nashik) आजूबाजूचा परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे वेळोवेळी अधोरेखित होत आहे. अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने पिंजरे लावून बिबट्यांना रेस्क्यू केले जात आहे. मात्र तरीदेखील रात्री अपरात्री दिवसा कधीही बिबट्या नजरेस पडत असल्याने नाशिक शहरासह सिन्नर तालुक्यात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. तालुक्यातील दापूर येथील गोनाई मळा परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. संस्कृती किरण आव्हाड असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण कायम आहे. 


सकाळी संस्कृती शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. बिबट हल्ल्यात संस्कृतीच्या मानेवर आणि तोंडावर बिबट्याच्या पंजाची नखे खोलवर गेल्याने ती गंभीर जखमी झाली. संस्कृतीने आरडाओरड करताच कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. संस्कृतीला कुटुंबियांनी उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. वनविभागाच्या (Nashik Forest) अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती कळविली असता, त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. परिसरातील शेतकऱ्यांनी याठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.


सिन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार बघायला मिळत असून अनेक पाळीव प्राण्यांनाही बिबट्याने भक्ष्य केले आहे. अशातच आता एका शाळकरी मुलीवर बिबट्याकडून हल्ला झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठवड्यात  सिन्नरच्या नायगावमध्ये तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यातच आज सकाळच्या सुमारास दापुर परिसरात लहान मुलीवर बिबट्याने झडप घातल्याने परिसरात दहशत पसरली आहे. 


बिबट्याचा बंदोबस्त करण्यासोबतच जनजागृती


नाशिकची (Nashik) ओळख बिबट्याचे माहेरघर अशी होऊ पाहत असतांनाच शेतकऱ्यांमध्ये सध्या बिबट्याची कमालीची दहशत बघायला मिळते आहे. रोज कुठे ना कुठे बिबट्याचा वावर दिसून येत आहे, त्यामुळे बिबट्याबाबत अधिकाधिक जनजागृती करणे आवश्यक आहे. सिन्नर परिसरात सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना समोर येत असून मागील काही दिवसात एकही बिबट्या रेस्क्यू करण्यात आलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग असो किंवा शहरी परिसर रोज कुठे ना कुठे बिबट्याचा वावर नाहीतर हल्ला केल्याच्या घटना या कानी पडत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात वनविभाग कमी पडत असल्याचं बघायला मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik Leopard : बिबट्यानं 15 मिनिटात चारदा झडप घातली, त्यानंही शेवटपर्यंत झुंज दिली, सिन्नरच्या विष्णूसोबत थरारक प्रसंग