(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : नाशिकमधून मोठी बातमी; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील चिमुकल्याची हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल
Nashik Crime News : या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
Nashik Crime News : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Nashik Crime News) रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमातून (Aadhartirth Aashram) धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथील अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ असलेल्या एका अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. या आश्रमातील एका चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही घटना समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
आश्रमाच्या मागील बाजूस मुलाचा मृतदेह आढळला
आलोक विशाल शिंगारे असे या चिमुकल्याचे नाव आहे. तो आधारतीर्थ आश्रमात त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास आलोकचा मृतदेह आधारतीर्थच्या मागील बाजूस एका सफाई कर्मचाऱ्याला आढळून आला. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तापसनीसाठी पाठविण्यात आला.
आलोकचा गळा आवळून खून
दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया निष्पन्न झाल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले. त्याचबरोबर सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आश्रमातील मुलांची, पदाधिकारी, कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, अशी माहिती कांगणे यांनी दिली.
अनेक वर्षांपासून आश्रम चर्चेत..
दरम्यान, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीचा आधारतीर्थ आश्रम म्हणून ओळखला जातो. राज्यभरातील अनेक मुले मुली आश्रमात राहतात. राज्यातील ज्या शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे, अशा राज्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या आश्रमात राहतात. या ठिकाणी उल्हासनगरचा आलोक शिंगारे आणि त्याचा मोठा भाऊ देखील राहत होता. परंतु दुर्दैवी चार वर्षीय आलोकचा या आश्रमात संशयास्पद मृत्यू झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या