Nashik Sinner News : 'तुमच्या साथीला आम्ही अहो ना बाबा', सिन्नरमध्ये माजी सरपंच शेतकऱ्याने कर्जापायी स्वतःला संपवलं!
Nashik Sinner News : सिन्नर तालुक्यातील माजी सरपंच असलेले शेतकरी राजेंद्र सखाराम खाडे (Rajendra Khade) यांनी कर्जापायी जीवनयात्रा संपवली आहे.
Nashik Sinner News : एकीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) केलेला कहर दुसरीकडे शेती मालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेतून आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील श्रीरामपुर (शिंदेवाडी) येथील माजी सरपंच असलेले शेतकरी राजेंद्र सखाराम खाडे (Rajendra Khade) यांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली आहे.
गेल्या महिनाभारत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती उभी केली आहे. मात्र यंदा कांदा (Onion), द्राक्षासह रब्बी पिकांच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात पिके दिली आहेत. दरम्यान नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कर्जाच्या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बँक व खासगी बचत गटाच्या कर्जाच्या विवंचनेतून सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असलेले राजेंद्र सखाराम खाडे (50) यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.
दरम्यान राजेंद्र खाडे यांची सिन्नरच्या (Sinnar) शिंदेवाडी येथे वडिलांसह त्यांच्या नावावर चार एकर जमीन आहे. त्याचबरोबर विहिरीसाठी शिंदेवाडी गावालगत दोन गुंठे जागा घेतलेली आहे. या ठिकाणी त्यांनी शेती उभारली आहे. यासाठी खाडे यांनी बँकेतून 2015 मध्ये दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. तसेच 2016 मध्ये स्वतःचे घर जामीन देऊन घरावर बोजा चढवून एका खाजगी फायनान्स कंपनीकडून दीड लाख रुपये कर्ज घेतले. खासगी बचत गटाकडून त्यांनी चाळीस हजार रुपयांचे कर्ज घेतले. वीज वितरण कंपनीचे दीड लाख रुपये विद्युत बिल त्यांच्या नावावर थकीत आहे. या नैराश्यातून त्यांनी कीटकनाशक सेवन करून आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान खाडे यांनी कीटकनाशक प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र खाडे यांच्या मृत्यूने खाडे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी छाबाबाई, मुलगा समाधान व कविता, जयश्री, योगिता, स्वाती या चार विवाहित मुली असा परिवार आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. असे असताना आता नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माजी सरपंच असलेले राजेंद्र खाडे यांनी आर्थिक विवंचनेतून कर्जामुळे आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.