Police Transferred : मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण...! बदलीबाबत नाशिक पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया
Maharashtra Police Transferred : हेल्मेट सक्ती असो किंवा महसूल आयुक्त विरोधात आकारलेला लेटर बॉम्ब, नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे नेहमीच चर्चेत राहिले.
Maharashtra Police Transferred : महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. बुधवारी गृह विभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी नाशिकमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार असल्याचे समजते. दरम्यान, नाशिक शहरात पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडेंनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात दीपक पांडे यशस्वी राहिले. त्यात हेल्मेट सक्ती असो किंवा महसूल आयुक्त विरोधात आकारलेला लेटर बॉम्ब असो, दीपक पांडे नेहमीच चर्चेत राहिले. बदली आदेश मिळाल्यानंतर दीपक पांडे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही. आणखी काय म्हणाले दीपक पांडे?
कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतले सर्व निर्णय, एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची महिला अत्याचार प्रतिबंध विभागात बदली करण्यात आली आहे. दरम्यान पांडे यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, महिला अत्याचार प्रतिबंध विभागा महानिरीक्षक पदी बदली झाली, बदलीसाठी मीच विनंती केली होती, नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सर्वात पहिला गुन्हा हा नाशिक शहरात दाखल झाला होता. तेव्हा दीपक पांडे यांनी कारवाईचे पाऊल उचलत राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस कोकणात रवाना केले होते. नारायण राणे यांच्याबाबत नाशिकमध्ये तक्रार करण्यात आली होती, त्यामुळे गुन्हा दाखल केला, असे पांडे म्हणाले, तसेच महसूल विभागाच्या लेटर बॉम्ब विषयी आजही ठाम असल्याचे सांगत दीड वर्षाच्या वादळी कारकीर्द अखेर संपुष्टात आल्याचे दीपक पांडे यावेळी म्हणाले.
भोंगा आदेशाबाबत कोणाला न्यायालयात जायचं असेल त्यांनी खुशाल जावं - दीपक पांडे
भोंगे संदर्भात नवा आदेश काढला याबाबत कोणाला न्यायालयात जायचं असेल तर त्यांनी जावे, सर्व निर्णय कायद्याच्या चौकटीत राहून घेतले, एकही निर्णयाचा पश्चात्ताप नाही, सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व निर्णय घेतले, rdx डिटोनेटर हे शब्द चुकीचे वाटत असतील मात्र मतावर ठाम आहे. पोलीस दलात 23 वर्ष सेवा केल्यानंतर आता समाजाला काही दिले नाही तर कधी देणार? असा सवाल पांडेंनी यावेळी केला, निवृत्त झाल्यावर काही बोलण्या पेक्षा महत्वाच्या पदावर असताना नजरेस आणून दिलेले कधीही योग्य असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
महिला अत्याचार प्रतिबंध विभागात बदलीवर पांडे म्हणाले...
महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाची प्रमुखपदाची जबाबदारी मिळाली, त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येतील, महिला संदर्भात अनेक चांगले निर्णय घेता येतील. मुंबईमध्ये गोदावरी नदी नाही त्यामुळे पुन्हा नळाच्या पाण्यात अंघोळ करावी लागणार, पण सर्वानी नदीमध्ये स्नान करावे असे आवाहन दीपक पांडेंनी नाशिकच्या जनतेला केले आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
बुधवारी गृह विभागाकडून परिपत्रक काढून राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता. त्यांच्या जागी नाशिमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार होते. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बदली झाली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली होती. बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. तसंच पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संदीप कर्णिक यांचं पुण्यात पुनरागमन झालं होतं. पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता. इकडे मिलींद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली होती. भारंबे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार होते.
संबंधित बातम्या
Police Transferred : पोलिसांच्या बदल्यांबाबत गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना 12 तासांतच स्थगिती