नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात (Nashik Central Assembly Constituency) वसंत गिते (Vasant Gite) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे महाविकास आघाडी बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील (hemlata Patil) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून एबीपी माझाशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.


नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने वसंत गिते यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर गुरुवारी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी थेट काँग्रेस कमिटीलाच टाळे ठोकले होते. यानंतर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निर्धार मेळावा बोलावला आहे. नाशिक मध्यची जागा काँग्रेसला सुटावी, यासाठी काँग्रेस पदाधिकारी आग्रही होते.  हेमलता पाटील आणि राहुल दिवे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत गिते यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस इच्छुक नाराज झाले असून इच्छुकांनी निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. आजच्या निर्धार मेळाव्यात याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.  


हेमलता पाटील भावूक 


नाशिक मध्य विधानसभाची जागा शिवसेना उबाठा गटाला सुटल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. हेमलता पाटील काँग्रेस पक्षाकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक होत्या. दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढणार का? या प्रश्नावर हेमलता पाटील भावूक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले. 


अन्यथा अपक्ष निवडणूक लढणार


तर नाशिक मध्यची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्याने हेमलता पाटील यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पक्षाला पाठवला आहे. 29 तारखेपर्यंत मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाची वाट बघणार अन्यथा अपक्ष निवडणूक लढणार असे म्हणत हेमलता पाटील यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. मागील पाच वर्षांपासून हेमलता पाटील निवडणुकीची तयारी करत होत्या. मागील पंचवार्षिक निवडणुकीत हेमलता पाटील यांना 47 हजार मते मिळाली होती. अपक्ष निवडणूक लढण्याआधी प्रदेश प्रवक्ते पदासह पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. तर आता काँग्रेसने निवडणूक लढली नाही तर पाच महिन्यांनी महापालिका निवडणुकीला पक्ष कसा सामोरा जाणार? असा सवाल देखील हेमलता पाटील यांनी पक्षाच्या श्रेष्ठींना विचारला आहे. आता हेमलता पाटील नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Elections 2024 : गितेंची डोकेदुखी वाढणार! दिंडोरी लोकसभेसारखाच बसणार फटका? नाशिक मध्य मतदारसंघात घडामोडींना वेग, नेमकं काय घडतंय?