नाशिक : लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Elections 2024) दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना त्यांच्याच आडनावाशी साधर्म्य असलेल्या भगरे नावाच्या उमेदवारामुळे मतविभागणीचा मोठा फटका बसला होता. आता तोच कित्ता विधानसभा निवडणूकीत (Maharashtra Assembly Elections 2024) गिरवला जाण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून (Nashik Central Vidhan Sabha Constituency) दोन वसंत गिते (Vasant Gite) समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गितेंची गितेंमुळेच डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. 
 
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करण्यासाठी भगरे नावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे निवडणूक रिंगणात उतरले. भगरे या सारख्या आडनावामुळे बाबू भगरे भाव खावून गेले. याचा परिणाम खासदार भास्कर भगरेंच्या मतांवर झाला. डुप्लिकेट नावाच्या बाबू सदू भगरेंना तब्बल 1 लाख 3 हजार 632 मतं मिळाली. त्यामुळे आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंचे मताधिक्य घटले. 


वसंत शंकर गीते यांनी नेला उमेदवारी अर्ज


आता तोच कित्ता नाशिक मध्य मतदारसंघात गिरवला जाण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत निवृत्ती गिते यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. वसंत गिते यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या वसंत शंकर गिते (Vasant Shankar Gite) यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने हा चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे यामागे विरोधकांची खेळी आहे की काय? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता या बंडखोरांना थोपण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. 


नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी


दरम्यान, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने वसंत गिते यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी थेट काँग्रेस कमिटीलाच टाळे ठोकले होते. यानंतर आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निर्धार मेळावा बोलावला आहे.  नाशिक मध्यची जागा काँग्रेसला सुटावी, यासाठी काँग्रेस पदाधिकारी आग्रही होते.  हेमलता पाटील आणि राहुल दिवे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून वसंत गिते यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस इच्छुक नाराज झाले असून इच्छुकांनी निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. आजच्या निर्धार मेळाव्यात याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. या मेळाव्यात नेमका काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार