Israel Strikes on Iran: इस्रायलने इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती समोर येत आहे. इराणच्या लष्करी तळांनादेखील इस्रायलकडून लक्ष्य करण्यात आले आहे. इस्रायलनं फायटर जेटनं हल्ले केल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. ईरानच्या माध्यमांनीही या स्फोटांची पुष्टी केली आहे. तर इस्रालयच्या हल्ल्यात आमचा सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. स्वसंरक्षणासाठी हल्ले केल्याची माहिती इस्रायलने अमेरिकेला दिल्याचे समजते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या सैन्याने इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले आहे, जे कथितपणे अणुबॉम्ब तयार करण्याच्या कामात गुंतले होते. त्याचबरोबर त्यांनी असा दावा केला की, इस्रायली सैन्याने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या केंद्रावरही अचूक हल्ला केला आहे. इस्रायलने या कारवाईला "Strength of a Lion" असे नाव दिले आहे. नेतन्याहूंनी हवाई हल्ल्याबाबत सांगितले की, इस्रायलच्या अस्तित्वासाठी इराणकडून निर्माण होणारा धोका लक्षात घेता, "ऑपरेशन राइजिंग लायन" सुरू करण्यात आले आहे. हा हल्ला तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत हा धोका पूर्णपणे संपत नाही.
इराणी चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी यांच्या मृत्यूचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्करी मुख्यालयावर, दोन अणुऊर्जा केंद्रांवर, IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) च्या वरिष्ठ कमांडरांवर आणि अणुशास्त्रज्ञांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले आहेत. इराणच्या सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी यांना ठार मारण्यात आले आहे, असा दावा देखील इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणच्या माध्यमांनी, दोन अणुऊर्जा स्थळांवर हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे.
इराणचा आण्विक कार्यक्रम हल्ल्याचे कारण
इस्रायल आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून तणावाचे संबंध आहेत. इस्रायलने यापूर्वीही इशारा दिला होता की, जर इराणने शस्त्र बनवण्यायोग्य युरेनियमचा संवर्धन प्रकल्प सुरूच ठेवला, तर तो लष्करी कारवाई करेल. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, इराणचे युरेनियम संवर्धन कार्य आता शस्त्रनिर्मितीच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे.
अमेरिकेने हल्ल्यातील सहभाग नाकारला
इस्रायलच्या या ऑपरेशनमध्ये अमेरिकेचा सहभाग असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितले की, या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही. "इस्रायलने ही कारवाई आपल्या स्वसंरक्षणाच्या हितासाठी केली आहे. आमची प्राथमिकता आमच्या सैनिकांच्या सुरक्षिततेची आहे," असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिकन सैनिकांवर किंवा तळांवर हल्ला करू नये, असा इशारा देखील त्यांनी इराणला दिला आहे.
आणखी वाचा