(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : सावधान! लम्पी सदृश रोगाचा जनावरांना पुन्हा धोका, मालेगावात 65 हजाराहून अधिक जनावरांना लसीकरण; प्रशासन सतर्क
नाशिक जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहे. कारण, जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy skin disease ) धोका वाढत आहेत.
Lumpy Skin Disease : सध्या नाशिक जिल्ह्यातील पशुपालक चिंतेत आहे. कारण, जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy skin disease ) धोका वाढत आहेत. जिल्ह्यातील मालेगावमध्ये लम्पी सदृश्य रोगाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम व्यापक करण्यात आली आहे.नाशिकच्या मालेगावात 1 लाख 10 हजार 134 पशुधनापैकी 32 पशू वैद्यकीय दवाखाण्यातून 65 हजार 500 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर उर्वरित जनावरांचे देखील लसीकरण लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ.जावेद खाटीक यांनी दिली.
लसीकरण आणि वेळीच उपचार घेतल्यास लम्पी आजार बरा होऊ शकतो
मालेगावातील टाकळी गावात 11 जुलैला एका बैलाला लम्पी सदृश रोगाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर बैल पूर्णपणे बरा झाला आहे. मागील लसीकरणाचा मोठा फायदा झाल्याने यंदा जास्त प्रमाणात लम्पी सदृश जनावरे आढळले नाहीत. मागील वर्षी लम्पी रोगाच्या साथीत मालेगावात 13 जनावरे दगावली होती. दरम्यान, लम्पी हा व्हायरल विषाणूजन्य रोग असून लसीकरण आणि वेळीच उपचार घेतल्यास रोग बरा होवू शकतो, असे पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी
या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जन जागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा. लम्पी आजारावर उपयुक्त असणाऱ्या लस आणि औषधांची उपलब्धता जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करुन करावा. लम्पी चर्म आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्यातून लसीकरण मोहीम हाती घ्यावी, अशा सचूना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हा रोग माशा, डास, गोचिड इत्यादी किटकांमार्फत पसरत असल्यानं प्रत्येक ग्रामपंचायतीने पशुसंवर्धन विभागाने शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करावी. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत आणि जिल्हा परिषद सेस यातून औषधे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करून द्यावा असेही सांगण्यात आले आहे. लम्पी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळं घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: