Kisan Sabha Protest : हातात चटणी भाकरी, अंगात ताप, तरीही 'दळवी बाबा' आंदोलनावर ठाम; शेतकऱ्यांच्या आंदोलनाची इनसाइड स्टोरी
Kisan Sabha Protest : नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे.
Kisan Sabha Protest : नाशिकमध्ये (Nashik) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज पाचवा दिवस आहे. वातावरणातील बदलामुळे अनेक आंदोलकांना साथीच्या आजाराची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात 4 दिवसांची पायपीट करत आलेले एक 88 वर्षीय आजोबाही आजारी आहेत. तर, अंगात ताप, अंगदुखी, खोकल्याचा त्रास होता असतांनाही आजोबा आंदोलनावर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. मुंबईला (Mumbai) निघालेल्या पायी लॉंग मार्चमध्येही देखील हे आजोबा सामील झाले होते.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, गुरुवारी 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली असतांना देखील हे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. पेठ तालुक्यातील गांगुडबारी गावचे 88 वर्षीय शेतकरी देवराम दळवी हे सोबत चटणी भाकरी आणि दोन दिवसांचे कपडेलत्ते सोबत घेऊन शुक्रवारी पायी लॉंग मार्चमध्ये दाखल झाले होते. चार दिवसांची पायपीट करत सोमवारी ते नाशिकला येऊन पोहोचले होते. मात्र, वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलीय. सर्दी, खोकला, अंगदुखी सोबतच मधून मधून अंगात तापही भरत असल्याचं ते सांगतात. उन्हामुळे आणि पायी चालत त्यांच्या पायाची साले निघाले असून पायाला भेगाही पडल्या आहेत.
सरकार फक्त आश्वासन देत आहे...
कोणी काही खायला दिलं तर देवराम दळवी खातात आणि औषध घेऊन रस्त्यावर सतरंजी टाकत ईतर सहकाऱ्यांसोबत झोपी जातात. मागे मुंबईला धडकलेल्या लॉंग मार्चमध्येही दळवी बाबा सामील झाले होते. मात्र, सरकार फक्त आश्वासन देत असल्याने यावेळी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा त्यांनी निर्धार केला आहे.
आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार
माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला पायी लॉंग मार्च सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता. दरम्यान आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा इशारा आंदोलकांकडून सरकारला देण्यात आला आहे. आतापर्यंत शासनासोबत तीन बैठका आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या झाल्या आहेत. मात्र कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार असून, या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे आंदोलनामुळे शहरातील मुख्य रस्ता पाच दिवसांपासून बंद असल्याने शहरवासीय मात्र वेठीस धरले जातायत.
इतर महत्वाच्या बातम्या :