Nashik : किकवी नदीवरील प्रकल्पाला पुन्हा एकदा 'किक', 1400 कोटी खर्चून नाशिकला मिळणार अतिरिक्त पाणी
Kikvi Project Nashik: किकवी प्रकल्पामुळे नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे.
नाशिक : गेल्या बारा तेरा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडलेला बहुचर्चित आणि महत्वाकांक्षी किकवी प्रकल्प लवकरच साकार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या धरणामुळे नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे.
नाशिक शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि शहराच्या लोकसंख्येत होणारी लक्षणीय वाढ लक्षात घेता गंगापूर, मुकणे, वैतरणा धरणातून होणारा पाणीपुरवठा भविष्यात कमी पडणार आहे. नाशिकला पाणी पाजणारे गंगापूर धरणातील वाढत्या गाळ साठ्यामुळे पाणी साठा कमी होत आहे. गाळ साठल्यामुळे कमी झालेला पाणीसाठा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरणाच्या उर्ध्व बाजुला किकवी नदीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात बेझे गावाच्या परिसरात किकवी धरण उभारण्यासाठी समीर भुजबळ यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सातत्याने रखडला.
मात्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने (WRD) या प्रकल्पाला पुन्हा एकदा 'किक' दिली असून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे किकवी नदीवर 2.4 TMC क्षमतेचे धरण बांधण्याची योजना आखली आहे. सदर प्रकल्पासाठी सुमारे 1400 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असणार आहे. यासाठी जवळपास 912 हेक्टर जमीनीची पाहणी करण्यात आली असून यामध्ये 172.47 इतकी जमीन वनखात्याच्या अधिपत्याखाली आहे. सदर जमिन संपादित करण्यासाठी 600 कोटी रुपये तर उर्वरित 800 कोटी रुपये धरणाच्या बांधकामासाठी खर्च केले जातील, अशी माहिती प्राथमिक माहिती आहे.
सध्या नाशिक शहराला गंगापूर, मुकणे, वैतरणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या चार वर्षांत शहराची पाण्याची गरज 600 एमसीएफटीने वाढली आहे. ती 4.9 टीएमसी वरून 5.6 टीएमसी एवढी झाली आहे. यासाठी गंगापूर धरणातून 4 टीएमसी, मुकणे धरणातून 1.5 टीएमसी आणि दारणा धरणातून 0.1 टीएमसी इतका विसर्ग होतो. मात्र गंगापूर धरणाची 7.2 टीएमसी इतकी क्षमता असताना गेल्या काही वर्षांमध्ये गाळ साठल्याने 1.8 टीएमसीने कमी झाली आहे. धरणातील गाळ काढणे हे अवघड काम असून त्यासाठी मोठ्या निधीचीही आवश्यकता आहे. दरम्यान किकवी नदीवरील धरणाचा आराखडा जलसंपदा विभागाच्या तांत्रिक पॅनेलकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.
नाशिक शहराचा विकास याच वेगाने पुढे जाण्यासाठी पाण्याचा नवीन स्त्रोत आवश्यक आहे. या धरणामुळे नाशिककरांचा भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न मिटणार आहे. भावी पिढीच्या भवितव्याचा विचार करून किकवी धरण होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच किकवीमुळे गोदावरीची पुरस्थिती सुद्धा नियंत्रणात येऊन नाशिक मधील गोदावरी काठावरील सततची टांगती तलवार दुर होणार आहे.
वैतरणाचे अतिरिक्त पाणीही वळविणार
सद्यस्थितीत वैतरणा धरण पूर्ण पातळीपर्यंत भरल्यानंतर सांडव्यावरून वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीत पडून ते अरबी समुद्राला जाऊन मिळते. या वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा उपयोग नाशिक व नगर जिल्ह्यातील औद्योगिक, सिंचन आणि पिण्यासाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे वैतरणा कटक बंधाऱ्याशेजारी सांडवा बांधून अरबी समुद्रात वाहून जाणारे वैतरणाचे तीन टीएमसी पाणी मुकणेमध्ये वळण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने राज्य शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नाशिक व नगरच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविता येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून रखडलेला प्रकल्प जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. मागील प्रकल्पाची निविदा रद्द झाल्याने सदर प्रकल्पाची निविदा जलसंपदाच्या वतीने काढण्यात आली असून या संबंधीचा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल अशी आशा आहे.






















