Dindori Lok Sabha 2024 : काही दिवसांपूर्वी भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली. यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकरून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. या पार्श्वभूमीवर माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी भाष्य केले आहे. 


दिंडोरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नाही, म्हणून ही जागा माकपला सोडावी, अशी मागणी जे पी गावित यांनी केली आहे. त्यामुळे दिंडोरीच्या जागेवरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांनी या आधीच जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) लढण्याची घोषणा नाशिक दौऱ्यावर असताना केली होती. 


...अन्यथा माकप इंडिया आघाडीतून बाहेर पडणार


आता राष्ट्रवादीने ही जागा माकपसाठी सोडावी, असा आग्रह माकपकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडून येणारा सक्षम उमेदवार नसल्याचा दावा जे पी गावित यांनी केला आहे. राज्यातील दिंडोरीची एक जागा तरी माकपला द्यावी, अन्यथा माकप इंडिया आघाडीतून बाहेर पडणार, असा इशाराही देण्यात आला आहे. 


दिंडोरीची जागा नक्की कुणाला मिळणार? 


माकप मागील निवडणुकीप्रमाणे स्वतंत्र उमेदवारी करण्याच्या तयारीत आहे. माजी आमदार जे पी गावित हे दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांचे नाव चर्चेत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय झाला नाही तर आम्ही आम्ही भूमिका घेऊ, असे जे पी गावित यांनी म्हटले आहे. जे पी गावित यांच्या इशाऱ्यानंतर आता यावर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच दिंडोरीची जागा महाविकास आघाडीतून कुणाला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


नाशिक, दिंडोरीच्या जागा मविआकडे झुकतील - जयंत पाटील


दरम्यान, नाशिक जिल्ह्यात शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे वारं वाहतंय. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे झुकतील. जनतेचा कौल आम्हालाच मिळेलच. ४८ पैकी अनेक जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाशिक दौऱ्यावर असताना व्यक्त केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या


Dindori Lok Sabha 2024 : दिंडोरी लोकसभा: भाजपसाठी कागदावर अनुकूल स्थिती, विरोधकांची मोट धक्का देणार?


दुपारी शरद पवारांकडून घोषणा, सायंकाळी जयंत पाटलांनी नाशिक, दिंडोरी लोकसभेबाबत स्पष्टच सागितलं!