Rahul Gandhi Road Show in Nashik : पाच दिवसांपूर्वी राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली. नंदुरबार, धुळ्यातून ही यात्रा नाशिक शहरात पोहोचली. नाशिक शहरात राहुल गांधींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या रोड शो दरम्यान चोरट्यांनी नाशिककरांच्या खिशावर डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. तब्बल साडे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
राहुल गांधींचा रोड शो दरम्यान चोरट्यांनी नाशकात धुमाकूळ घातला. याबाबत पोलीस (Nashik Police) ठाण्यात नोंद झाल्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाची रक्कम समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार चोरट्यांनी तीन लाख 63 हजारांचा ऐवज चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बांधकाम साहित्याचे पुरवठादार राजू कापसे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) फिर्याद दाखल केली आहे.
मोबाईल, रोख रक्कम, दागिने चोरीला
गुरुवारी ते राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. द्वारका भागातील राधिका हॉटेल परिसरात भामट्यांनी त्यांच्या खिशातील पाकिट लांबविले. त्यांच्यासह इतर काहींच्या खिशाला चोरट्यांनी कात्री लावली आहे. 3 लाख 63 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. यात पाकिट, मोबाईल, रोख रक्कम तसेच दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राहुल गांधींनी केले अभिवादन
दरम्यान, राहुल गांधी यांनी आज धारावी येथे नागरिकांना संबोधित केले. त्यानंतर ते मुंबईतील दादर परिसरातील चैत्यभूमी येथे दाखल झाले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
इंडिया आघाडीची रविवारी शिवाजी पार्कवर सभा
उद्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या देखील उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ इंडिया आघाडीकडून मुंबईत फोडले जाणार आहे. या सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा