Jayant patil : आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. नाशिक लोकसभा मतदारसंघाची (Nashik Lok Sabha) जागा शिवसेना ठाकरे गट तर दिंडोरी लोकसभेची (Dindori Lok Sabha) जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढवणार असे त्यांनी म्हटले. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


काल शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभेचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच असतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज शरद पवारांनी नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोक्साभेबाबत घोषणा केली. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. जयंत पाटील यांनी नाशिकची दिंडोरीच्या जागेवर महाविकास आघाडीच निवडून येणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.  


नाशिक जिल्ह्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे वारं वाहतंय


जयंत पाटील म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे वारं वाहतंय. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी अशा दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे झुकतील. आम्हाला नारा देण्याची गरज नाही. जनतेचा विश्वास, जनतेचा कौल आम्हालाच मिळेलच. ४८ पैकी अनेक जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 


आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो


आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणुका आहेत, मंत्रिमंडळाने घेतलेले सर्व निर्णय निवडणुकांमुळे तातडीने घेतलेले निर्णय आहेत. मात्र आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.  या निर्णयाची अंमलबजावणी देखील तातडीनं व्हावी, ही अपेक्षा, असे त्यांनी म्हटले आहे. 


जागा वाटप लवकरच होईल


आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत जयंत पाटील म्हणाले की, जागा वाटप लवकरच होईल. 15-16 तारखेला आमची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होईल. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जागा वाटपावर एक-दोनदा चर्चा झाली आहे. त्यांनी पत्र पाठवलंय, बैठकीत त्यावर निर्णय होऊन त्यांना कळवले जाईल, असे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले. 


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha 2024 : हेमंत गोडसेंना उमेदवारी, शांतीगिरी महाराजांची नाराजी, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवर महायुतीतून आक्षेप