Ahmednagar News : ... म्हणून घरभरणीला घरात कुणीही आलं नाही, आज बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड, नगरमध्ये उभारलं इको फ्रेंडली बांबू हाऊस
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील हे बांबूपासून बांधलेल दुमजली घर (Bamboo House) सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
Ahmednagar News : स्वतःचे सुंदर घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र बांधकाम साहित्याच्या गगनाला भिडलेल्या किंमती आणि आपली आर्थिक कुवत यांची सांगड घालणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळे घराचे स्वप्न हे मृगजळ वाटू लागले आहे... मात्र अहमदनगरच्या (Ahmednagar) एका शिक्षकाने लोखंडाऐवजी बांबू, वीट बांधकामासाठी रॅप ट्रॅप आणि कॅव्हीटी पद्धतीचा वापर करून केवळ स्वस्तात घरच बनवलं नाही तर त्याच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन देखील केल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हे बांबू हाऊस (Bamboo House) सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
अहमदनगरच्या बुरुडगाव रस्त्यावरील फुलसौंदर मळ्यात सतीश गुगळे (Satish Gugale) या शिक्षकांने 2000 चौरस फुटांचे दोन मजली पर्यावरण पूरक घर बनवले आहे...विशेष म्हणजे हे घर बांधण्यासाठी त्यांनी लोखंडा ऐवजी बांबूचा वापर केला आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात 35 ते 40 टक्के बचत झाली असल्याचं गुगळे सांगतात... लोखंड वापरल्यास प्रतिचौरस फूटासाठी जवळपास बाराशे ते तेराशे रुपयांहुन अधिकचा खर्च येतो. मात्र बांबूमुळे हाच खर्च अवघ्या सातशे ते आठशे रुपयांवरती आला आहे. विशेष म्हणजे अगदी कॉलम पासून ते स्लॅबपर्यंत त्यांनी लोखंडाच्या सळ्या ऐवजी बांबूचा (Bamboo) वापर केला आहे. त्यांनी बांबूची मजबूतता तपासण्यासाठी या बांबूची पुणे आणि अहमदनगर येथे लॅब टेस्टिंग देखील करून घेतली.
सुरुवातीला सर्वांनाच हा निव्वळ वेडेपणा वाटलेला मात्र, जवळपास 11 वर्षे झाली हे घर सुस्थितीत आहे. विशेष म्हणजे अहमदनगर आर्किटेक्चर इंजिनियर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा 2012-13 चा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड देखील याच घराला मिळाला आहे. सुरुवातीला त्यांनी ही कल्पना जेंव्हा इंजिअरला सांगितली तर अनेकांनी अशा पद्धतीने बांबूपासून घर बनवून देण्यास असमर्थता दर्शवली, तर ज्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांनी अर्ध्यातच काम बंद करून निघून गेले, तरी देखील हतबल न होता, गुगळे यांनी बांधकाम क्षेत्राचा 76 वर्षांचा अनुभव असलेले गोपीराज नायडू, संगमनेरचे स्ट्रक्चरल डिझायनर मधुकर वाकचौरे, सिव्हिल इंजिनिअर आशिष मुथियान यांचं मार्गदर्शन घेतल आणि हे दोन मजली घर बांधलं.
अस झालं बांधकाम?
बांधकाम व्यावसायिक गोपीराज नायडू म्हणाले कि, बांधकामाचा 40 ते 45 टक्के खर्च हा लोखंड आणि आरसीसी कामावरती होतो. लोखंडाची आणि बांबूची ताकद शास्त्रीय आधारानुसार सारखीच समजली जाते. बांबू वापरल्याने लोखंडाच्या खर्चात 80 टक्के बचत होते. या "कल्पतरू" घरात पायापासून बांबूच्या कामट्यांचा वापर करण्यात आलेला आहे. फ्लोरिंग स्लॅबमध्ये कामट्यांच्या जाळ्यांबरोबरच विटांच्या तुकड्यांचा वापर झाल्याने वाळू सिमेंट मिश्रणामध्येही बचत झाली आहे. तर स्लॅब ओतत असतांना दिवाळीच्या पणत्यांच्या या उलट्या ठेवल्या. छतात सुंदर कलाकुसर देखील तयार करण्यात आली आहे.. कॅव्हिटी वॉल पद्धतीत उभ्या विटांचा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे वीट, सिमेंट आणि वाळूच्या वापरात देखील 25 ते 30 टक्के बचत झाली आहे. भिंतीत तीन इंचाची पोकळी निर्माण झाल्याने बाहेरील आणि आतील तापमानात पाच ते सहा अंशांचा फरक होऊन घरातील तापमान हिवाळ्यात गरजेएवढे उष्ण आणि उन्हाळ्यात आवश्यक तेवढे थंड राहते.
निसर्गपूरक दुमजली घर
खिडक्याही ब्रिटिश कालीन वास्तूंच्या धरतीवर जमिनीपासून योग्य अशा उंचीवरती असल्याने घरातील हवा खेळती राहते...विशेष म्हणजे सतीश गुगळे यांनी घराबाबत जसा वेगळा प्रयोग केला. तसेच त्यांनी घरातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प देखील घरासमोरच तयार केला. त्यामुळे त्यांच्या घरातील वापरासाठी लागणारा गॅस त्यातून त्यांना मिळतो. सोबतच कचऱ्याची समस्या देखील सुटते. गुगळे यांनी घरासमोर एक औषधी वनस्पतीची बाग लावली आहे. त्यात वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील लोकांचे आरोग्य देखील सुदृढ राहते. पावसाळ्यात घराच्या छातावरचे पाणी त्यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून शेजारील विहिरीत सोडले आहे.. खर तर असे घरं बनवणे म्हणजे एक प्रकारचे धाडसच होते, मात्र सतीश गुगळे यांना त्यांच्या घरच्यांची देखील साथ मिळाली.
तेव्हा घरात कुणीही शिरलं नाही....
लोखंडा ऐवजी बांबूच्या वापर केल्याने हे घर कधीही पडू शकते. या भीतीने घरभरणीच्या कार्यक्रमासाठी आलेले लोक घरात न बसता बाहेरून घर पाहणं पसंत करत होते. पण 11 वर्ष झाले हे बांबू हाऊस ऊन, वारा, पाऊस सहन करत भक्कमपणे उभं आहे. असाच पद्धतीने शासनाच्या विविध योजनांमधून बांधून दिले जाणारे घर बांबुतच बनवले, तर नक्कीच शासनाचा पैसा वाचेल, पर्यावरणाचे संरक्षण होईल, बांबू उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शासनाने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यातही बांबूचा वापर केला, तर पर्यावरण संवर्धनासोबतच शासनाचा पैसा वाचणार आहे. गुगळे यांनी बनवलेलं हे बांबू हाऊस पाहण्यासाठी मोठ्या मोठ्या नेत्यांसह इंजिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी अशा 10 हजार लोकांनी आतापर्यंत भेट दिली आहे. जर तुम्हालाही कमी खर्चात असे पर्यावरण पूरक घर उभारायचे असेल तर एकदा तरी सतीश गुगळे यांच्या घराला भेट दिलीच पाहिजे.