नाशिक : आम्हाला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ नको, मात्र रस्ता बनवून द्या, अशी संतप्त मागणी येवला (Yeola) तालुक्यातील देवळाणे-तळवाडे येथील महिलांनी केली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील सुमारे 1 हजार लोकवस्तीला जोडणाऱ्या देवळाणे-तळवाडे या रस्त्याची (Devlane-Talwade Road) दुरावस्था झाली असून खड्ड्यांच्या (Potholes) साम्राज्यामुळे रस्ताच हरवून गेला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून हा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिला असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. 


अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2024) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) घोषणा केली. याअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेचा लाभ आम्हाला नको. आम्हाला देवळाणे-तळवाडे हा रस्त्या बनवून द्या, अशी मागणी देवळाणे-तळवाडे येथील महिलांनी केली आहे. 


25 वर्षांपासून रस्ता दुर्लक्षित 


देवळाणे-तळवाडे या रस्त्याने शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक, आजारी नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून खड्डे व चिखलाने माखलेला हा रस्ता पायी चालण्यास सुद्धा योग्य नाही. गेल्या 25 वर्षांपासून संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे.


लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, आम्हाला रस्ता करून द्या


यावेळी महिलांनी म्हटले की, आम्हाला लाडक्या बहिणीचा पगार नकोय. 25 वर्षांपासून आमचा रस्ता चिखलाचा आहे. देवळाणे-तळवाडे रस्ता आम्हाला करून द्या. आमचे मुलं याचा दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून शाळेत जातात. आजारी नागरिकांना या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकांना गाडी चालवतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो. आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आम्हाला हा रस्ता तातडीने करून द्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.


लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात साडे सहा लाखांहून अधिक अर्ज 


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शहरासह ग्रामीण भागातील महिलांकडून अर्ज मागवले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख 57 हजार 74 महिलांची नोंदणी झाली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 3 लाख 69 हजार 696 महिलांनी ऑफलाइन तर 2 लाख 87 हजार 378 महिलांची ऑनलाइन नोंदणी केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Ladki Bahin Yojana : पुरुषांसारख्याच स्त्रियाही व्यसनाधीन, पंधराशे रुपये फक्त लाडक्या बहिणीलाच का? लाडकी बहीण योजनेला विरोध!


CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होण्याचा धोका, 'त्या' चर्चेवर सुधीर मुनगंटीवार संतापून म्हणाले....