नाशिक : लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana), भाऊनंतर आता लाडकी बायको योजना आणा, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले होते. तसेच पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना घेणे, हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असेही त्यांनी म्हटले. यावरून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.
सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
जयंत पाटलांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही
जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत सुनील तटकरे म्हणाले की, धनंजय मुंडे कुठे जाण्यासाठी इच्छुक आहेत, असं मला वाटत नाही. असे आत्मघाती वक्तव्य करत जयंत पाटील नेमकं कुठल्या मार्गावर जात आहे असं मला त्यांना विचारायचं आहे. लाडकी बहीण ऐवजी लाडकी बायको आणा, असं म्हणणारे जयंत पाटील यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी जयंत पाटलांवर केली आहे.
अजितदादांची जनसन्मान यात्रा नाशिकमधून निघणार
नाशिकमध्ये झालेल्या बैठकीबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहावा अर्थसंकल्प मांडला. राज्याच्या अर्थकारणाला, समाजकारणाला, सर्वांना ताकद देणारा संकल्प राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मांडला गेला. अजितदादांची जनसन्मान यात्रा आम्ही ऑगस्टपासून सुरू करत आहोत त्याची सुरुवात नाशिकपासून करणार आहोत. सर्व घटकांची अजितदाद थेट संवाद साधणार आहेत. माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे. सर्वच मतदार संघातून यात्रा जाणार आहे. काही सत्रामध्ये शेतकरी वर्ग, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. या यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नरहरी झिरवाळ बैठकीला गैरहजर, सुनील तटकरे म्हणाले...
नाशिकच्या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अनुपस्थित होते. ते नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, उद्या दिंडोरीची सभा आहे. आजच्या सभेला नरहरी झिरवाळ उपस्थित नाही याचा अर्थ असा नाही की ते नाराज नाहे. सगळा बातम्या पेरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा
Jayant Patil : 'धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी प्लॅन', जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य