नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुती सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (CM Ladki Bahin Scheme) योजनेसंदर्भात सध्या एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अर्थखात्याचा तीव्र विरोध होता. तरीही एकनाथ शिंदे यांनी हट्टाने ही योजना पुढे रेटली, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात उघडपणे सुरु झाली आहे. यावरुन विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने राज्य सरकारवर टीका सुरु केली आहे. या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. पण जेव्हा सातवा वेतन आयोग लागू केला तेव्हा 44 हजार कोटीचा बोजा पडला. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, असे म्हणाला नाही. मात्र, दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजना लागू करण्यासाठी 46 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तेव्हा काँग्रेस नेते म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल. आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी त्याचा जीडीपीसोबत कर्ज प्रमाण किती आहे, ते पाहिलं पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आपली सत्ता यावी, असे काँग्रेसचे स्वप्न होते. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. काँग्रेसवाले मुख्यमंत्री लाडकी बहीण विरोधात अपप्रचार करत आहेत. कधी म्हणतात आम्ही कोर्टात जाऊ, कधी म्हणतात महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, कधी फॉर्ममध्ये चुका शोधतात, कधी आम्ही योजना बंद करु असे सांगून घाबरवतात. ज्यांना या योजनेचे पैसे नको आहे त्यांनी पैसे घेऊ नये. सरकार मोफत शिक्षण देत आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देत आहे. त्यामुळे काँग्रेसने तत्वज्ञान सांगू नये. या योजनेमुळे काँग्रेसची झोप उडाली आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेला विरोध म्हणजे महाराष्ट्रातील महिलांना विरोध: मुनगंटीवार
महाविकास आघाडीमध्ये अनेक इच्छुक मुख्यमंत्री आहेत.. त्यामुळे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 10 केबिन तयार करावी लागतील. जर हे सत्तेत आले तर हे आतापासूनच अधिकाऱ्यांना धमकी देत आहे आम्ही सत्तेत येणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आमचा पराभव झाला तर आम्ही सर्व निवडणूक पराभूत होऊ असे नाही. या योजनेला विरोध म्हणजे महिलांना विरोध आहे, महाराष्ट्राच्या गरिबांना विरोध आहे, शेतकऱ्यांना विरोध आहे. त्यामुळे यांना उत्तर महाराष्ट्रातल्या भगिनींनी तरुणींनी विद्यार्थ्यांनी दिले पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आणखी वाचा